वेल्हे, ता. ३१ : पाबे (ता. राजगड) गावच्या हद्दीत पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यामध्ये मंगळवारी (ता. ३१) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र बबन भोसले (वय ४०, रा. भुरूकवाडी, विंझर, ता. वेल्हे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आप्पा उर्फ पांडुरंग भिका रेणुसे, महेश बापू रेणुसे आणि मनोज रेणुसे (पूर्ण नाव माहीत नाही) (सर्व रा. पाबे) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माहितीनुसार, ३० मार्च २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राजेंद्र भोसले हे पाबे गावच्या हद्दीत पाबे कमानीजवळ उभे होते. यावेळी आरोपींनी, पैसे मागितल्याच्या कारणाचा राग मनात धरून भोसले यांना गाठले. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, आरोपी मनोज रेणुसे याने हातातील रॉडने भोसले यांच्या डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात भोसले जखमी झाले आहेत.