वाल्हे, ता. १९ : जेजुरी येथील ग्रामदैवत जानाई देवी यांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे (ता. पुरंदर) नजीक भुजबळ कामठवाडी येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. पाटण तालुक्यातील निवकणे येथील यात्रेसाठी निघालेला हा पालखी सोहळा गुरुवारी (ता. १९) सायंकाळी पहिल्या मुक्कामासाठी येथे दाखल झाला.
पालखीच्या आगमनापूर्वीच ग्रामस्थांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. मार्गावर रांगोळ्या काढून फुलांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. पालखी येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय जानाईदेवी’ च्या घोषणांत पालखी गावात दाखल झाली. जेजुरीहून निघालेल्या या सोहळ्यात देवीचे मानकरी, आजी-माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने पायी सहभागी झाले होते. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान कामठवाडी फाट्यावर पालखीचे आगमन होताच तरुणांनी पालखी खांद्यावर घेत जयघोषात गावात प्रवेश केला. ठिकठिकाणी औक्षण करून भाविकांनी पालखीचे स्वागत केले. पालखीचा मुक्काम सोनबा भुजबळ यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आला. पालखी सोहळा विसावल्यानंतर पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे व पालखी सोहळ्याचे प्रमुख नागनाथ झगडे यांच्या हस्ते समाजआरती पार पडली. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच सागर भुजबळ, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, तानाजी भुजबळ, सतीश भुजबळ, महेंद्र भुजबळ, पवन दुर्गाडे, दत्तात्रेय पवार, मयूर भुजबळ, रणजीत भुजबळ, सुशांत भुजबळ, गणेश भुजबळ, दादासाहेब मदने, तेजस दुर्गाडे आदी उपस्थित होते.
शुक्रवारी (ता. २०) पहाटे वाल्हेकरांचा निरोप घेऊन पालखी सोहळा नीरा नदीवरील दत्तघाटावर जाणार असून तेथून सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.