यवत, ता. २० : जादूगर के विनोद म्हणजे विनोद कुलकर्णी हे माजी सैनिक मागील ५० हून अधिक वर्षांपासून काळ जादूचे प्रयोग करत लोकांचे मनोरंजन करत आहे. हे काम ते १९८२ पासून करत आहे. त्यांनी सैन्यदलात सेवादेखील केलेली आहे. सैन्यात असतानाही ते नकला व विविध कला सादर करत होते. अंगीभूत कलेला आपले गुरू जादूगार झामा यांच्याकडून पैलू पाडून घेतल्यावर त्यांनी स्वतंत्र प्रयोग करण्यास सुरुवात केली. सततचा प्रवास, प्रयोगापूर्वीची तयारी करण्यासाठी होणारा खर्च, प्रयोगातून मिळणारे तुटपुंजे उत्पादन अशी मोठी कसरत ते आयुष्यभर करत आले आहेत. मात्र याचा आपल्या चेहऱ्यावर लवलेशही न दाखवता कुलकर्णी हे मनोभावे या कलेची सेवा करत आहेत.
मुळचे बिदर (कर्नाटक) येथील असलेले कुलकर्णी सध्या पुण्यातील हडपसर येथे वास्तव्यास आहेत. आयुष्याची अनेक वर्षे महाराष्ट्रातच घालविल्यामुळे त्यांना कन्नड भाषेची कमी, मराठीची चांगली जाण आहे. ते जादूच्या प्रयोगासोबतच कथाकथन, प्रबोधनपर व्याख्यान, आचार्य अत्रे यांचे साहित्य अशी विविध विषयांवरही ते बोलत असतात.
शाळा, महाविद्यालय, वाढदिवस समारंभ, लग्न समारंभ, यात्रा, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव अशा कोणत्याही समारंभात आपली कला सादर करण्यात ते तत्पर असतात. एका दिवशी एकच प्रयोग हा त्यांचा शिरस्ता आहे. देतील त्या बीदागीतून आपला चरितार्थ चालविण्याबरोबरच त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले आहे. आज वयाच्या ७२व्या वर्षीही ते तरुणांना लाजवतील अशा उत्साहात आपले प्रयोग सादर करत असतात. एकदा वेळ दिली की मग ती भल्या पहाटेची असो, सायंकाळची असो वा रात्रीची असो, सांगितलेल्या वेळेपूर्वी पोहोचणे हा नियम ते आयुष्यभर जपत आले आहेत. कधी-कधी ज्यांनी प्रयोगाचे आयोजन केले आहे तेही विसरून गेलेले असतात, अशा स्थितीला सामोरे जातानाही कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर कधीही राग किंवा चिडचिडीचे भाव दिसले नाहीत. शून्यातून सुरुवात करून प्रयोग पार पाडायचा किंवा फारच अडचण आली तर तो न करताही परत यायचे, अशी वेळ अनेकदा त्यांनी अनुभवली आहे. अतिशय कटू प्रसंगातही त्यांनी आपल्या कलेवरील निष्ठा ढळू दिली नाही.
कुलकर्णी यांनी १९७४ ते १९८१ या काळात प्रत्यक्ष सैन्यदलात काम केले. त्यानंतर माजी सैनिक म्हणून त्यांनी १९९१पर्यंत नोकरी केली. सैन्यदलातील नोकरीच्या कालावधीतच त्यांनी आपल्यातील नकला, तबलावादन, प्रबोधन अशा वेगवेगळ्या कला सादर करण्यास सुरुवात केली. १९८२ पासून ते जादूच्या प्रयोगांसोबतच विविध सादरीकरण करत आहेत.
छोट्या-मोठ्या जादूगरांची संख्या पुण्यात मोठी आहे. जादू ही विज्ञानाधिष्ठित कला आहे. या कलेचा मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यास चांगला उपयोग होऊ शकतो. भोंदूगीरीचा समाजावरील प्रभाव नष्ट करण्यामध्ये जादूगरांची कला महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भोंदूगिरी ही दैवी शक्ती नसून ती विज्ञानावर आधारित हातचलाखी आहे, हे लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी जादूच्या प्रयोगांसारखा चांगला दूसरा पर्याय नाही.
- विनोद कुलकर्णी, जादूगार