पुणे, ता. १९ ः ‘‘बदलत्या जीवनशैलीत आरोग्यविषयक जागरूकतेमुळे साखर खाणारा वर्ग कमी होत आहे. परिणामी साखरेचा घरगुती होत असलेला वापर मर्यादित झाला आहे. याशिवाय शीतपेयांमध्येसुद्धा साखरेचे प्रमाण घटल्याने साखर उद्योगासमोर चिंतेची परिस्थिती आहे,’’ असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. तसेच साखर निर्यातीसाठी पाच लाख टन अतिरिक्त कोट्याची मागणीही यावेळी केली.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘साखरेचे उत्पादन जास्त आणि मागणी कमी असल्याने उद्योग टिकविण्यासाठी केंद्र सरकारने बायो सीएनजी, इथेनॉलचे प्रमाण, साखरेची निर्यात आणि बाजारातील साखरेचा दर वाढविण्याची गरज आहे. साखर उद्योगाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री प्रल्हाद जोशी यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविले असून, उद्योग वाचविण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे.’’ दरम्यान, साखरेचे उत्पादन, साखर उद्योगातील अडीअडचणी यासंदर्भात महासंघाने पुढील दहा वर्षांचे साखर धोरण तयार केले आहे. यानिमित्त आयोजित कार्यशाळेत धोरणाचे पुण्यात सादरीकरण करण्यात आले.
‘एफआरपी’सोबत ‘एमएसपी’ वाढली पाहिजे
‘‘उसाचा रास्त किफायतशीर दर (एफआरपी) वाढण्यासोबतच किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढली पाहिजे. दोन्हीमध्ये सध्या तफावत झाल्याने कारखान्यांचे नुकसान होते. केंद्र सरकारकडे चार हजार १०० रुपये प्रतिक्विंटल ‘एमएसपी’ची मागणी केली आहे. त्याचबरोबर ‘एफआरपी’, ‘एमएसपी’, इथेनॉल, सहवीज निर्मिती यांच्यात दरवाढ केली पाहिजे. सध्या उसाचा उत्पादन खर्च (तोडणी आणि वाहतुकीसह) चार हजार रुपये प्रतिटनापेक्षा जास्त आहे. साखर कारखान्यांना राष्ट्रीय पातळीवर साखरेचा मिळणारा दर तीन हजार ७५० रुपये प्रतिक्विंटल आहे. साखरेची किंमत प्रतिक्विंटल चार हजार १०० रुपये करावी, ’’ अशी मागणी पाटील यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.