ब्रिजमोहन पाटील : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २८ : झाडाची फांदी वाकली आहे, संपूर्ण झाडच एकाच बाजूला झुकले आहे, ते काढून टाका... झाडाच्या वाळलेल्या फांद्या तोडून टाका अशा अनेक तक्रारी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे काही नागरिक प्रत्यक्षात भेटून तर काहीजण ऑनलाइन करतात. प्रशासन या तक्रारींना केराची टोपली दाखवत असल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होतेच, पण हा प्रसंग पुणेकरांच्या जिवावर बेतत असल्याचेच वर्तक बाग येथील दुर्घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
पुण्यात ५१ लाख ३७ हजार ६०२ झाडांची नोंद आहे. पुण्यावर हा हिरवा शालू कायम पांघरलेला असावा, यासाठी वृक्षारोपनासह झाडांच्या संवर्धनासाठी पुणेकर हातभार लावतात. महापालिकेचे प्रकल्प, इमारतींचे बांधकाम, खासगी प्रकल्पांसह इतर कारणांनी झाडे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीकडे अर्ज केला जातो. जागा पाहणी करून योग्य त्या सूचना करून त्यास परवानगी दिली जाते. त्याचप्रमाणे अनेक रस्त्यांवर व वीज रोहित्राच्या बाजूने झुकलेल्या आणि वाळलेल्या फांद्या काढण्यासाठी नागरिक तक्रारी करतात. सहाय्यक आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील वृक्ष संवर्धन समिती त्यावर कार्यवाही करते. ही नियमावली असली तरी अधिकारी, कर्मचारी त्याकडे काणाडोळा करतात.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी तरतूद
शहरातील रस्ते, पादचारी मार्गांवरील धोकादायक झाडे, फांद्या काढणे, छाटणी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी १२ ते १५ लाख रुपयांची तरतूद असते. त्यातून मनुष्यबळ उपलब्ध करणे, झाडांच्या छाटणीसाठी यंत्रणा उपलब्ध करणे याकामांवर खर्च केला जातो. तसेच प्रत्येक परिमंडळासाठी ट्री कटिंग गाडी उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांच्या तक्रारी दाखल झाल्यानंतरही ठेकेदार, अधिकारी त्यांच्या सवडीने त्यावर कार्यवाही करतात.
जीवितहानी अन् आर्थिक नुकसान
शहरात वादळ, मुसळधार पाऊस झाल्यानंतर अनेक झाडे उन्मळून पडतात, फांद्या तुटून वाहनांसह घरांवर पडत असल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होते. २०२३ मध्ये ८७७ झाडे पडल्याची नोंद अग्निशामक दलाकडे आहे. महापालिकेने वेळच्यावेळी फांद्यांची छाटणी न केल्याने, वाळलेल्या फांद्या न काढल्याने मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागते. असाच प्रकार शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळ घडला असून, यात अभिजित गुंड या तरुणाच्या डोक्यात वाळलेली फांदी पडून त्याचा मृत्यू झाला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
वृक्ष तोड, छाटणी संदर्भातील सर्व अधिकार महापालिका आयुक्तांनंतर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून काय निर्णय घेतले आहेत, किती तक्रारी प्रलंबित आहेत याचा कोणताही आढावा महापालिकेत घेतला जात नाही. तसेच विशिष्ट प्रकरणांत माहिती आवश्यक असेल तर ते आयुक्तांपर्यंत जाते. पण इतरवेळी क्षेत्रीय कार्यालयांच्या कारभाराची माहिती एकत्र संकलित होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारींची माहिती उपलब्ध होत नाही. हा गोंधळ कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे.
वृक्षतोड, फांद्यांच्या छाटणीचे सर्व अधिकारी क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांकडे आहेत. त्याचा उद्यान विभागाशी संबंध येत नाही. धोकादायक वृक्ष काढणे, फांद्या तोडण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी अर्थसंकल्पात तरतूद असते.
- अशोक घोरपडे,
सचिव, वृक्ष संवर्धन प्राधिकरण
शहरातील झाड पडण्याच्या घटना
२०२० - ११५२
२०२१ - ६९५
२०२२ - ९७९
२०२३ (ऑक्टोबरपर्यंत) - ८७७
वादळ, मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडतात. फांद्या तुटून वाहनांसह घरांवर पडतात. आता तर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत आपले मत मांडा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.