नैतिक मूल्ये आणि संस्कार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नैतिक मूल्ये मानवी जीवनातील मूलभूत आदर्श आणि विचारधारा आहेत. तर संस्कार हा एक संपूर्ण मानवी समुदायातील आदर्श आणि संस्कृतीचं अंग आहे. ते मानवी समुदायातील समाजाच्या संरचनेच्या भागात स्थापित होतात. संस्कार जीवनाच्या विविध प्रवाहांना संचालित करतात आणि त्यांना एक मानवी आदर्शात लपवतात.
- डॉ. विशाल गायकवाड, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी, पुणे
एकविसावे शतक समाजासाठी काय घेऊन येणार आहे याची उत्कंठा शिगेला पोचलेली असतानाच आज आपण असंख्य अनपेक्षित गोष्टी आपल्याच भोवताली घडताना पाहत असतो. लहानसहान भांडणांतून खून पडेपर्यंत किंवा छेडछाडीपासून अगदी अत्याचार होईपर्यंतच्या घटना आपल्या दैनंदिन जीवनाचा जणू भाग झाला आहे असा आभास होतो. हे सगळे कसे थांबेल याचे उत्तर शोधूनही सापडत नाही व जे काही बिघडले आहे त्याची डागडुजी करण्यापेक्षा जे आपण सावरू शकतो ते सावरावे असे मनोमन वाटू लागते. कुठेतरी आपले संस्कार किंवा नैतिक मूल्यांचे आपल्या पाल्यांना दिलेले बाळकडू कमी पडतात कि काय? असाही प्रश्न पडतो. मुळात नैतिक मूल्यांचे संस्कार कुठेतरी कमी पडत आहेत याची जाणीव होते व या जाणीवेसोबतच पालक तसेच शिक्षकांची जबाबदारीसुद्धा तितकीच वाढते.
स्वामी विवेकानंद म्हणायचे की, ‘‘आपल्याला पाहिजे आहेत सामर्थ्यशाली, तेजस्वी, आत्मविश्वासी तरुण आणि असले शंभर युवक जरी मिळाले तरी जगात खरोखर क्रांती होऊन जाईल.’’ त्यांच्या एका वाक्यात येणाऱ्या शतकातील भारत दडलेला आहे. पण असा भारत घडवण्यासाठी व एक सुज्ञ, समजूतदार, खंबीर व चरित्रवान तरुणाई उभी करण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल हे निश्चित.
मुलांना समाजात सामान्यपणाची आणि सदाचाराची ओळख करून घेण्यासाठी नैतिक मूल्ये समजून घेण्याची आवश्यकता असते. प्रत्येक पालकाने व शिक्षकाने खालील महत्त्वाच्या नैतिक मूल्यांची आठवण आणि शिकवण मुलांच्या अंगीकृत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.
१. सत्यनिष्ठा : लहानग्यांच्या मनावर मोठ्यांनी गिरवलेले सत्याचे धडे लहान मुले विसरत नाहीत, त्यामुळे मुलांची सत्य या विषयावर अभ्यासणी व उजळणी करणे आवश्यक आहे.
२. समरसता : मुलांनी इतरांच्या सुखदुःखाशी एकरूप व्हावे. समरसता मुलांना इतारांप्रती प्रेम व सद्भावना विकसित करण्यास व प्रत्येकाशी बंधुत्व निर्माण करण्यास मदत करते.
३. धैर्य : धैर्य किंवा संयम हा एक सद्गुण आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रेत्येकजण मनशांतीच्या शोधात असतो आणि म्हणूनच धैर्य हे मुलांना शांत व संयमी स्वभावाकडे घेऊन जाते.
४. सहिष्णुता : मुलांच्या स्वभावातील भाव आणि भावना समजून घेणे आवश्यक आहे. सहिष्णु मुलांमध्ये संघर्षाची क्षमता विकसित होते व ते वेगवेगळ्या परिस्थितीशी संयमाने सामना करू शकतात.
५. विश्वास : मुलांना विश्वासाची अपेक्षा असते व तो त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच निर्माण करणे आवश्यक आहे. हे मूल्य त्यांना जीवनातील आणि अभिवृत्तीतील असणाऱ्या संघर्षांमध्ये मदत करते.
६. समानता : समानतेच्या अभ्यासनिमुळे मुलांना समाजातील इतर लोक आपले वाटू लागतात. आपापसांत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न केल्यामुळे प्रेम, मैत्री, जिव्हाळा टिकून राहतो.
७. धर्मनिष्ठा : धर्म म्हणजे जात नव्हे तर अंतःप्रेरणा, नीती व न्याय. मनुष्याचा धर्म म्हणजे माणुसकी व दया करणे. मनुष्य धर्मनिष्ठा हा अति महत्त्वाचा विषय मुलांना समजावून सांगायलाच हवा.
८. विनम्रता : ज्याप्रमाणे आभूषणे खूप लोकांचे लक्ष वेधतात अगदी त्याचप्रमाणे विनम्र व्यक्ती सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करते. त्यामुळे मुलांना विनम्र बनवणे ही एक फार मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी आहे.
त्याचबरोबर न्यायवाद, अहिंसा, इमानदारी व समजूतदारपणा ही सुद्धा महत्त्वाची नैतिक मूल्ये आहेत जे मुलांच्या मनावर बिंबवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
नैतिक मूल्यांची वरील दिलेली यादी ही जरी सर्वसमावेशक नसली
तरी ती फार महत्त्वाची आहे. चला तर मग, मुलांना संस्कारांसोबतच नैतिक मूल्ये ही शिकवूयात...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.