पुणे : प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे तीन महत्त्वपूर्ण घटक म्हणजे वाहनांतील कार्बन उत्सर्जन, औद्योगिक चिमण्यांमधून निघणारा धूर आणि औष्णिक विद्युत प्रकल्पातील सल्फर डायऑक्साईड! केवळ वाहने आणि उद्योग जर बंद केले तरीही अपायकारक प्रदूषणाची (एरोसोल) पातळी कमी होणार नाही. उलट ती वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शहरी प्रदूषण रोखण्यासाठी आता एका नव्या दृष्टिकोनाची गरज भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रासच्या (आयआयटी मद्रास) शास्त्रज्ञांनी अधोरेखित केली आहे. विशेष म्हणजे या संशोधनाचे नेतृत्व जळगाव जिल्ह्यातील डॉ. सचिन गुंठे या मराठमोळ्या शास्त्रज्ञाने केले आहे.
कोरोना काळात संपूर्ण देशात टाळेबंदी असताना शास्त्रज्ञांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन पार पाडले.
कारण यावेळी चेन्नई शहरातील सर्व वाहने आणि उद्योग बंद होते. चालू होता फक्त तो दोनशे किलोमीटरवरील नेवेली औष्णिक विद्युत प्रकल्प. प्रा. गुंठे सांगतात, ‘‘कोरोनाही आमच्या संशोधनासाठीची अभूतपूर्व स्थिती होती. कारण फक्त औष्णिक विद्युत केंद्रातून येणाऱ्या सल्फर डायऑक्साईड सारख्या हानिकारक घटकांचे प्रमाण चेन्नईच्या वातावरणात होते. जगात प्रथमच केवळ औष्णिक विद्युत प्रकल्पातून होणाऱ्या उत्सर्जनाचा शास्रीय अभ्यास केला गेला.
प्रकल्पातून उत्सर्जित होणाऱ्या सल्फर डायऑक्साईडमुळे नवीन कण निर्मिती आणि क्लाऊड-फॉर्मिंग एरोसोल कणांची संवेदनशीलता तपासण्याची दुर्मिळ संधी प्राप्त झाली.’’ पीएच.डी.ची विद्यार्थी ऐश्वर्या सिंग यांचे हे प्रमुख संशोधन असून, क्लायमेट ॲण्ड ॲट्मोस्पिरीक सायन्सेस या शोधपत्रिकेत संबंधित संशोधन प्रकाशित झाले आहे.
असे झाले संशोधन...
- एरोसोलच्या नोंदी घेणारे विशेष संयंत्र आयआयटी मद्रासने विकसित केले
- कोरोना काळात विशेष परवानगीने ऐश्वर्या सिंग यांनी नोंदी चालू ठेवल्या
- हवेची अशी स्थिती प्रचंड दुर्मिळ असल्याने शास्त्रज्ञांनी आव्हानात्मक परिस्थितीत काम चालू ठेवले
- हवेतील पीएम २.५ या एरोसोल कणाच्या निर्मितीचा अभ्यास करण्यात आला
संशोधनाचे निष्कर्ष
- शहरातील इतर सर्व प्रदूषणाचे स्रोत बंद असतानाही एरोसोल कणांची निर्मिती वाढली
- औष्णिक विद्युत प्रकल्पातून उत्सर्जित होणारा सल्फर डायऑक्साईडच महत्त्वपूर्ण भूमिका
- प्रथमच केवळ दगडी कोळशाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या एरोसोल संदर्भातील संशोधन जगासमोर
संशोधनाचे फायदे
- प्रदूषणकारी केवळ एकच स्रोत बंद करून चालणार नाही, त्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजनांची गरज
- प्रदूषण रोखण्यासाठी होणारे संशोधन आणि धोरणांसाठी या संशोधनाचा सर्वाधिक फायदा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.