शिवकथाकार विजय देशमुख यांनी लिहिलेल्या ‘शककर्ते शिवराय’ (पाचवी शिवआवृत्ती), ‘राजा शंभू छत्रपती’ (पाचवी शिवआवृत्ती) व सूर्यपुत्र (तिसरी आवृत्ती) या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. १९) संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे. पौड रस्त्यावरील एमआयटी विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त....
- पं. वसंत गाडगीळ
महाराष्ट्राची आणि पुण्यनगरीची ओळख मी शृंगेरी शारदापीठाचे जगद्गुरू श्री अभिनव विद्यातीर्थ महाराजांना राजधानी दिल्लीत ५८ वर्षांपूर्वी करून देऊन पुण्यात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे ते शारदा संस्कृत पत्रिकेच्या नवम-वार्षिक महोत्सवासाठी आठवडाभर पुण्यात आले होते. या पुण्यनगरीत येऊन मी संस्कृतच्या अभ्यासाचा श्रीगणेशा केला. त्याला आता ७५ वर्षे झाली. भारत इतिहास संशोधक मंडळाचे प्रा. ग. ह. खरे, प्रा. दत्तो वामन पोतदार, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे, रा. चिं. ढेरे, पं. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, पं. महादेवशास्त्री जोशी यासारख्यांचे सखोल अभ्यासू जीवन ऐकले, वाचले. अभ्यासाचा प्रयास केला. सखोल संशोधन, अभ्यासाची, अक्षर ग्रंथ लेखनाची परंपरा नागपूर आणि नंतर पुण्यात संपन्न होत गेली.
मला माझ्या पुण्यनगरीत (९४ वीत पदार्पण करताना) आज घडत असलेला महद् भाग्याचा पुण्य-मंगलक्षणच मी मानतो. तो म्हणजे ‘शिवमय’ झालेल्या आज स्वतःच्या ८२ व्या वर्षी, ‘शककर्ते शिवराय’ या शिवचरित्रपर सर्वोत्कृष्ट ग्रंथरत्नाचे प्रकाशन करीत असलेल्या विजय महाराज देशमुख यांच्या दर्शनाने आणि पुणेकरांनी कधीही ऐकलेले नसेल अशा त्यांच्या ‘शिव-चरित्र’ श्रवणाने.
विजय देशमुख यांचे आजवरचे ८२ वर्षांचे जीवन म्हणजेच ‘शिवकार्य अन् गुरुकार्य’ यांचा अद्भुत संगमच. त्यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात गोडेगाव या खेड्यात झाला. त्यांनी ‘शिवकार्य’ व्रताचा श्रीगणेशा केला. आजवर त्यांनी राज्यात १० हजारांहून अधिक ‘शिवचरित्रा’वर व्याख्याने दिली आहेत. ती किमान सहा लाख शिवभक्तांनी ऐकली. सतत १८ वर्षे शिवदुर्ग दर्शन यात्रांचे नियोजन करून हजारो शिवभक्तांना दुर्गभ्रमंतीचे भाग्य मिळवून दिले आणि चरित्रलेखन, ग्रंथलेखन, प्रकाशनाबद्दल कोणताही मानधन वा मोबदला न घेता शिवकार्य शिवोपासनेचे पुण्याईचे शिखर गाठले. आता एक लाख घरांतून शिवचरित्र-शंभूचरित्र पोचावे म्हणून पुण्यात विशेष प्रकाशन आवृत्तीचा सोहळा आयोजिला आहे. याप्रसंगी एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त), पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.