पुणे, ता. १८ : तुम्ही मतदानाला गेला तर आता फार वेळ लागणार नाही. कारण, मतदान केंद्रांवर थेट निवडणूक अधिकाऱ्यांचा डोळा असणार आहे. रांगा दिसल्या, मतदान खोलीतील कर्मचाऱ्यांची ढिलाई दिसली तर थेट जिल्ह्याच्या मुख्यालयातून यंत्रणा हलविण्यात येणार आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभेचा अनुभव विधानसभा निवडणुकीत मतदारांना येणार नाही, असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी (ता. १८) व्यक्त करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिवसे म्हणाले, ‘‘शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर दोन सीसीटीव्ही असतील. त्याचे थेट प्रक्षेपण आम्हाला दिसेल. कुठेही रांगा लागल्याचे चित्र दिसले तर त्याठिकाणी आम्ही केंद्रातील अधिकाऱ्यांना सूचना करणार आहोत. मतदान केंद्रावर कमीत कमी रांगा लागतील, याचे नियोजन केले आहे. मतदान कक्षात चार मतदारांना एकावेळी घेतले जाणार आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’’
२१ विधानसभा मतदारसंघात ८ हजार ४६२ मतदान केंद्र आहेत. यातील सहा हजार ५९४ मतदान केंद्रावर सीसीटीव्ही असतील. मतदान केंद्रात एक आणि बाहेर एक असे दोन - दोन सीसीटीव्ही असणार आहेत. मतदान केंद्रात आत नेमके काय सुरू आहे, याची संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांना समजणार असल्याचेही डॉ. दिवसे यांनी सांगितले.
तर त्यांची दोन ओळखपत्रे पाहिली जाणार
जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादीची छाननी करण्यात आली. त्यानुसार गैरहजर, स्थलांतरित आणि मृत झालेल्या मतदारांची यादी तयार केली आहे. याची प्रत्येक मतदार केंद्रावर यादी ठेवण्यात येणार आहे. मतदार यादीच्या छाननी प्रसंगी गैरहजर असलेला मतदार जर मतदान करण्यासाठी आला तर त्याच्याकडे दोन ओळखपत्रे पाहिली जाणार असल्याचेही डॉ. दिवसे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.