भारताच्या वर्ल्डकप मोहिमेला सलामीलाच धक्का
महिला टी-२० विश्वकरंडक ः न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजी-फलंदाजीत निष्प्रभ खेळ
दुबई, ता. ४ ः महिला ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीलाच भारताला पराभव सहन करावा लागला. संथ असलेल्या दुबईतील स्टेडियमच्या खेळपट्टीचा अचूक फायदा घेणाऱ्या न्यूझीलंडने हा सामना ५८ धावांनी जिंकला.
मोठ्या अपेक्षा असलेला भारतीय संघ गोलंदाजी तसेच फलंदाजीतही निष्प्रभ ठरला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १६० धावा उभारल्या. या आव्हानासमोर भारताचा डाव १०२ धावांत आटोपला.
उत्तरार्धात संथ झालेल्या खेळपट्टीचा अचूक फायदा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी घेतला. पहिल्या षटकात स्मृती मानधनाने ११ धावा फटकावल्या होत्या; परंतु पुढच्या षटकांत शेफाली बाद झाली. स्मृतीलाही १२ धावांच्या पुढे मजल मारता आली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरचे अपयश कायम राहिले. जेमिमा रॉड्रिग्ज आणि रिचा घोष या आक्रमक फलंदाज हळुवार चेंडूवर फसल्या. त्यामुळे भारताने निम्मा संघ ७० धावांत गमावला, तेथेच मोठा पराभव निश्चित झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या न्यूझीलंडने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले. अनुभवी सुझी बेटस् आणि जॉर्जिया प्लिमर यांनी ६७ धावांची सलामी दिली; परंतु या दोघीही एकाच धावसंख्येवर बाद झाल्या. अरुंधती रेड्डी आणि शोभना यांनी विकेट मिळवल्या, त्यामुळे भारताला प्रतिकार करण्याची संधी मिळाली.
न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू अमेरी केर केवळ १३ धावांत बाद झाली, त्यामुळे न्यूझीलंडचे शतक फलकावर लागेपर्यंत १५ षटकांचा खेळ झाला होता. एव्हाना भारतीय गोलंदाजांनी पकड मिळवली होती; परंतु अनुभवी फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माच्या एका षटकांत १७ धावा फटकावण्यात आल्या. न्यूझीलंड कर्णधार सोफी डेव्हिनने ३६ चेंडूत नाबाद ५७ धावांचा तडाखा दिला, त्यामुळे त्यांना १६० धावांपर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड ः २० षटकांत ४ बाद १६० (सुझी बेटस् २७ - २४ चेंडू, २ चौकार, जॉर्जिया प्लिमर ३४ - २३ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, सोफी डेविन नाबाद ५७ - ३६ चेंडू, ७ चौकार, ब्रूक हॅलिडे १६ - १२ चेंडू, २ चौकार, रेणुका सिंग ४-०-२७-२, अरुंधती रेड्डी ४-०-२८-१, आशा शोभना ४-०-२२-१)
भारत १९ षटकांत सर्वबाद १०२ (स्मृती मानधना १२, शेफाली वर्मा २, हरमनप्रीत कौर १५, जेमिमा रॉड्रिग्ज १३, रिचा घोष १२, एडेन कार्ससन ४-०-३४-२, रॉसमेरी मेर ४-०-१९-४, लिया ताहूहू ४-०-१५-३)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.