पुणे, ता. १४ ः शहरातील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असताना त्यात भर घालण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. कचरा जाळण्याच्या घटनांवर नियंत्रण आणण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे (एनजीटी) आदेश असतानाही अशा घटना सुरूच आहेत. अशा घटनांची माहिती देण्यासाठी अजून कुठलीही थेट व्यवस्था नाही तसेच महापालिकेच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतरही तत्काळ प्रतिसाद मिळत नसल्याने हवेच्या प्रदूषणात भर पडण्याचे प्रकार सुरूच आहेत.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याबरोबरच गोळा केलेला कचरा जाळण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्याच्या सूचना ‘एनजीटी’ने महापालिकेला दिलेल्या होत्या.
अठरा पथकांची नियुक्ती
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांसह तो जाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने मागील वर्षी भरारी पथकाची नियुक्ती केली होती. १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी १५ व संपूर्ण शहरासाठी ३ अशा १८ पथकांची निर्मिती करून त्यांना १८ वाहनेही उपलब्ध करून दिली आहेत. परिसर, पुणे एअर ॲक्शन हब या संस्थांनी भरारी पथकाच्या कामाचा आढावा घेत त्यातील त्रुटी पुढे आणल्या होत्या.
भरारी पथकांची गती मंदावली
दरम्यान, या पथकाने मागील वर्षी कचरा जाळणाऱ्यांवर धडक कारवाई केली होती. यंदा मात्र जानेवारी व फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांत कारवाई थंडावल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी कागद, प्लॅस्टिकच्या वस्तू, कापड, पालापाचोळा नागरिकांकडून जाळला जातो. त्यात भर म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनही कचरा जाळण्याच्या घटना सुरू आहेत. भरारी पथकाकडून कारवाई सुरू असली, तरीही मागील दोन महिन्यांत त्याचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. पीएमसी केअर वगळता कचरा जाळण्याच्या घटनांची माहिती देण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. तक्रार दाखल केल्यानंतरही भरारी पथक वेळेत पोहोचत नसल्याचा आरोप पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी केला आहे. भरारी पथकांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी काही मिनिटात घटनास्थळी पोहोचून संबंधित व्यक्तीवर कारवाई करणे अपेक्षित आहे.
कचरा जाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. अधिकाधिक तक्रारी प्राप्त होण्यासाठी संपर्क क्रमांकदेखील देण्यात येत आहेत. कचरा जाळत असलेल्या ठिकाणी वेळेत पोहोचून भरारी पथक कारवाई करण्यावर भर देत आहे.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग, महापालिका
अशी झाली कारवाई
- वर्ष-पावती-दंड
- २०२४-५६४-५ लाख १३ हजार
- २०२५ (जाने/फेब्रु)-२५-१ लाख २५ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.