पुणे, ता. १० ः मोफत शिक्षण, नोकरीसह विविध मागण्यांसाठी मेट्रोच्या रुळावर उतरून आंदोलन करणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निलंबित कार्यकर्ता नरेंद्र पावटेकर, त्याचे वडील ज्ञानेश्वर पावटेकर यांच्यासह नऊ जणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आठ आरोपींच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी हा आदेश दिला. पुणे मेट्रोच्या महापालिका स्थानकाजवळ पेट्रोल घेऊन आंदोलन करणाऱ्यांनी रुळासह वायरींचे नुकसान केले आहे. मेट्रोसारख्या संवेदनशील ठिकाणीच आंदोलन करण्यामागे आंदोलकांचा घातपाताचा हेतू होता का, त्यांनी मेट्रो स्थानकावर येण्यापूर्वी कोणाला फोन, मेसेज केले, तसेच या घटनेमागचा सूत्रधार कोण, याबाबत तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.
विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी रविवारी (ता. ९) दुपारी दोन तास आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी वाद घालत धक्काबुक्की केली, तसेच त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. या झटापटीत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्यासह पाच पोलिस कर्मचारी आणि एक महिला जखमी झाल्या. त्यानंतर सर्व आंदोलकांवर खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमविणे, दंगल आणि मेट्रो रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या आंदोलकांना सोमवारी (ता. १०) न्यायालयात हजर करण्यात आले होते.
कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा कोणताही आदेश नसताना आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, विभागीय आयुक्त कार्यालयासारख्या शासकीय कार्यालयांऐवजी मेट्रोसारखे संवेदनशील ठिकाणच का निवडले, आरोपी वारंवार माध्यमांना बोलवा, असे म्हणत होते, त्यामागे त्यांचा कोणता उद्देश होता. त्यांनी गुन्ह्याचा कट कुठे रचला, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील श्रीधर जावळे आणि तपास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केली.
मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
आंदोलक विरोधी पक्षातर्फे समाजहिताचे आंदोलन करत होते. मेट्रो स्थानकावर आंदोलकांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. त्यांच्याकडे पेट्रोल होते, ही पोलिसांनी रंगविलेली कहाणी आहे. यातून मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो, असा युक्तिवाद आरोपींचे वकील ॲड. आदित्य झाड आणि ॲड. सिद्धार्थ राठोड यांनी केला.
या आरोपींना पोलिस कोठडी
नरेंद्र ज्ञानेश्वर पावटेकर (वय २५), ज्ञानेश्वर गणपतराव पावटेकर (वय ६२, दोघे रा. गणेश पेठ), अतुल सुदाम गायकवाड (वय ४५, रा. लोणी काळभोर), भरतगीर सोमवारगीर गिरी (वय ३५, रा. डांगे चौक), अजिंक्य संग्राम कदम (वय २१, रा. धनकवडी), गणेश अशोक जवंजाळ (वय ४६, रा. कसबा पेठ), प्रियांका कुणाल धंडुके (वय २७, रा. रविवार पेठ), सुकन्या राजेंद्र जोरकर (वय २९, रा. सोमवार पेठ), कल्पना महेंद्र परदेशी (वय ४६, रा. गणेश पेठ).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.