सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १२ : ‘जिल्ह्यात अधिकाधिक औद्योगिक गुंतवणूक व विकास व्हावा म्हणून उद्योगस्नेही धोरण राबविण्यात येत आहे. त्यामुळे उद्योगांच्या सामाजिक सुरक्षेला महत्त्व देण्यात येत आहे. कोणत्याही घटकाकडून त्रास होत असल्यास कंपन्यांनी खुलेपणाने माहिती द्यावी,’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी केले केले.
औद्योगिक संघटना, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग, मोठे उद्योजक, बँकर्स यांच्या औद्योगिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबाने, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी आदी उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ‘‘राज्यात अधिकाधिक गुंतवणूक यावी म्हणून महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा (मैत्री २.०) पोर्टल या एकाच व्यासपीठावरून सर्व परवानग्या, सुविधा देण्याची व्यवस्था तयार केली आहे.’’
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘पुणे जिल्हा उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे. उद्योगवाढीसाठी शासन आणि उद्योगांनी एकत्रित प्रयत्न करावेत. जिल्हा पातळीवर एक समिती कार्यरत आहे. या समितीची दर दोन महिन्याला बैठक घेऊन उद्योग प्रतिनिधींना त्यासाठी आमंत्रित करण्यात येईल. जागा, वीज, पाणी, मनुष्यबळ आदींबाबत त्यांच्या अडचणी, समस्या गतीने सोडविण्यात येतील.’’ गिरबाने म्हणाले, ‘‘एकूण निर्यातीत पुणे जिल्हा देशात पहिल्या पाच क्रमांकात आहे. अभियांत्रिकी निर्यातीमध्ये तर पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.’’
-------
‘पुणे अॅग्री हॅकेथॉन’चे आयोजन
पुढील महिन्यात प्रशासन देशात पहिल्यांदाच नावीन्यपूर्ण अशी ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ आयोजित करणार आहे. यासंदर्भात कृषी क्षेत्रातील संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण करत असलेल्या मोठ्या उद्योगांसोबतच नवकल्पनांच्या माध्यमातून स्टार्टअप स्थापन करणाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात येईल, असे डुडी यांनी सांगितले. राजपूत यांनी सांगितले की, ‘या परिषदेत सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सुमारे १७२ सामंजस्य करार होतील. या गुंतवणुकीमुळे ५० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील.’
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.