पुणे, ता. १८ : देवगड हापूसच्या नावाने होणारी बनावट आंब्यांची विक्री थांबवण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे देवगड हापूस आंब्याला भौगोलिक संकेत (जीआय टॅगिंग) करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर ‘टॅपर प्रूफ सील युआयडी’ असेल. शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हे स्टिकर लावणे बंधनकारक असणार आहे.
या प्रकल्पाकरिता ‘टीपी सील युआयडी’चे पेटंट असलेल्या मुंबईतील ‘सन सोल्यूशन्स’ या संस्थेबरोबर देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने करार केला आहे. त्या बाबतची माहिती संस्थेचे संचालक ओंकार सप्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘देवगड तालुक्यातील हापूस आंबा हा एक विशिष्ट सुगंध व चवीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्या देवगड हापूसच्या नावाखाली विक्री होणारे सुमारे ८० टक्क्यांहून अधिक आंबे हे देवगड मधील नाहीत. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे बनावट देवगड आंब्यांची विक्री थांबविणे, हा या मागील मुख्य हेतू आहे. जीआय नोंदणी नसलेले आणि स्टिकर नसलेले आंबे कोणीही देवगड हापूसच्या नावाने विक्री करताना आढळल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’’
तपासणी कशी कराल?
आंबा देवगडचाच आहे का हे तपासण्यासाठी ग्राहकांनी ९१६७६६८८९९ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर आंब्याचे आणि त्यावरील स्टिकरचे छायाचित्र पाठवावे. ही सिस्टम त्या स्टीकर वरील कोड वाचते आणि स्टिकरच्या मागील क्रमांक लिहून पाठवण्यास सांगते. क्रमांक वाचण्यासाठी स्टीकर काढले असता त्याचे आपोआप दोन भाग होतात. जर व्हॉट्स अॅपद्वारे आलेला संपूर्ण कोड सिस्टीममधील ‘युआयडी’शी जुळला तर, ग्राहकास शेतकरी - विक्रेत्याचे नाव, मूळ गाव, जीआय नोंदणी क्रमांक आदी तपशील पाठवला जाईल. या पडताळणी प्रक्रियेमुळे ‘देवगड हापूस’ बाबतची विश्वसनीयता वाढेल, असे सप्रे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.