पुणे, ता. २३ : डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ ग्रंथालयाच्या वतीने गुणवंत गौरव पुरस्कार वितरण व ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. आवाबेन नवरचना संस्थेच्या ग्रंथपाल स्मिता पोळ यांना गौरवचिन्ह व कै. चंद्रभागा लक्ष्मणराव भिकुले यांच्या स्मरणार्थ एक हजार रुपयांचा धनादेश देऊन ‘गुणवंत ग्रंथालय कर्मचारी गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर विश्रांतवाडीतील जिजाऊ ग्रंथालयाला कै. लक्ष्मणराव रामजी भिकुले ग्रंथभेट पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच दहावी, बारावी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांना ‘गुणवंत गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्याअंतर्गत डॉ. आंबेडकर मेमोरिअल हायस्कूल, महादजी शिंदे हायस्कूल व धौरपडी व्हिलेज हायस्कूल येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना पैगंबरवासी एम. सी. पिंजारी यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी एक हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवस्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश खत्री आणि पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यवाह विश्वनाथ सातपुते यांनी तर सूत्रसंचालन ग्रंथपाल दिलीप भिकुले यांनी केले.
जागृती रिहॅबिलिटेशन सेंटरचा
नौसेना भवनात सामंजस्य करार
पुणे, ता. २३ : भारतीय नौदलाने जागृती रिहॅबिलिटेशन सेंटर प्रा. लि. यांच्यासोबत नवी दिल्लीतील नौसेना भवनात सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे नौदलातील विद्यमान व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बौद्धिक व विकासात्मक अक्षयत्व असलेल्या आश्रितांच्या आयुष्यभर काळजी व पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या वेळी सेंटरचे संचालक डॉ. अमर शिंदे, विजयकुमार झा, वीरसिंह खारियाल, शिल्पा बाजपाई, विवेक राजपूत, संदीप जाखड, टी. श्रद्धा, गुलरुख आनंद आदी उपस्थित होते.
एक वही, एक पेन
करा बाप्पाच्या चरणी दान
पुणे, ता. २३ : कसबा पेठेतील नवग्रह मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा हे ७६ वे वर्षे आहे. यानिमित्ताने तुळजापूर येथील तुळजाभवानी माता मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत मंडळ ‘एक वही, एक पेन बाप्पाच्या चरणी दान’ हा उपक्रम राबवीत आहे. त्यामुळे दर्शनासाठी येताना भाविकांनी दूर्वा, हार, फुले, नारळ, पेढ्यांऐवजी एक वही आणि एक पेन अर्पण करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. गणेशोत्सवात जमा झालेल्या साहित्यात मंडळ भर घालून गरजू विद्यार्थ्यांना वाटप करणार आहे.
हिंदू खाटीक समाजातर्फे
बारामतीत बेमुदत उपोषण
पुणे, ता. २३ : समाजाबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बारामती येथील प्रांत कार्यालयासमोर हिंदू खाटीक समाजाचे सदस्य करण इंगोले यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. राज्यातील हिंदू खाटीक समाजाने या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजाच्या या प्रश्नाकडे लक्ष घालावे, अशी मागणीही करण्यात आली. याप्रसंगी दिलीप गालिंदे, आनंद जवारे, विजय घोलप, मनोज जवारे, कैलास ताडे, विजय इंगवले आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.