‘केरळ स्टोरी’ला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराचा
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थी संघटनेकडून निषेध
पुणे, ता. ५ ः ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट छायांकनाचा पुरस्कार आणि त्याचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्याच्या निर्णयाचा भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) विद्यार्थी संघटनेने निषेध केला आहे. हा निर्णय केवळ निराशाजनक नाही, तर धोकादायक असल्याची भूमिका मांडणारे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे.
‘‘चित्रपटाआडून आपल्या बहुसंख्याकवादी, द्वेषपूर्ण अजेंड्याशी जुळणारा प्रपोगंडा राबवणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल, हे या सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे,’’ असे या पत्रकात संघटनेच्या अध्यक्ष गीतांजली साहू आणि सरचिटणीस वर्षा दासगुप्ता यांनी म्हटले आहे.
‘‘द केरळ स्टोरी हा चित्रपट नाही, तर ते एक शस्त्र आहे. मुस्लिम समाजाची बदनाम करण्यासाठी आणि नेहमीच सर्व धर्मांमधील सौहार्द, शिक्षण व प्रतिकारासाठी उभे राहिलेल्या केरळसारख्या संपूर्ण राज्याला खलनायक ठरवण्यासाठी या चित्रपटातून एक खोटी कथा रचण्यात आली आहे. जेव्हा शासनपुरस्कृत संस्थेतर्फे अशा चुकीची माहिती पोहोचवणाऱ्या आणि अल्पसंख्याकाविषयी अपप्रचार करणाऱ्या चित्रपटांना मोठे केले जाते, तेव्हा केवळ ते कलेला मान्यता देत नाहीत; तर हिंसाचाराला खतपाणी घालतात,’’ अशा शब्दांत संघटनेने पुरस्काराचा निषेध नोंदवला आहे. ‘‘आम्ही चित्रपट या कलेचा अभ्यास करत असताना चित्रपटाला केवळ सरकार पुरस्कृत धार्मिक विद्वेषाचे एक हत्यार होताना पाहू शकत नाही. इस्लामोफोबिया आता पुरस्कारयोग्य आहे, हे स्वीकारण्यास आम्ही नकार देतो,’’ असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
----- --- ---- ----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.