पुणे, ता. २२ ः शहरातील विविध गुंड टोळ्यांना देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करणाऱ्या मध्य प्रदेशातील उमराटी गावातील कारखान्यांवर पुणे पोलिसांच्या पथकाने शनिवारी पहाटे छापा टाकला. या कारवाईत ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २१ पिस्तुले, काडतुसे, तसेच पिस्तुले तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग जप्त करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांत शहरात टोळीयुद्ध वाढले आहे. त्यातून एकमेकांवर हल्ला करण्यासाठी पिस्तुलांचा वापर झाला आहे. या गुन्ह्यांत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पिस्तुलाबाबत चौकशी केली असा ती मध्य प्रदेशातून आणल्याचे स्पष्ट झाले होते. चौकशीत पोलिसांना महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेजवळ असलेल्या उमराटी गावात पोलादापासून चाकू, सुरी करणाऱ्या कारागिरांकडून देशी बनावटीची पिस्तुले तयार करण्यात येतात, असे समजले होते. त्यानंतर पोलिसांनी उमराटी गावातील पिस्तुले तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापा घालण्याचे निश्चित केले, अशी माहिती सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत दिली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, उपायुक्त निखिल पिंगळे, संदीप भाजीभाकरे आणि सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक या वेळी उपस्थित होते.
महिनाभरात २१ पिस्तुले जप्त
गेल्या महिन्याभरात विमानतळ पोलिस ठाणे, काळेपडळ पोलिस ठाणे, खंडणीविरोधी पथक, तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी शहराच्या वेगवेगळ्या भागांत कारवाई करून सराइतांकडून २१ पिस्तुले जप्त केली होती. विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपासात उमराटी गावातून पिस्तुले आणल्याचे माहिती मिळाली होती.
१०० पोलिसांचा सहभाग
या कारवाईसाठी पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. गुन्हे शाखेची पथके, पोलिस मुख्यालयातील गॅस गन पथक, क्लिक रिस्पॉन्स टीम, बिनतारी संदेश यंत्रणा पथक (वायरलेस), मोबाईल सर्व्हेलन्स पथकासह १०० पोलिस कर्मचारी शनिवारी पहाटे उमराटी गावात पोहोचले. तेथे विरोध होण्याची शक्यता असल्याने पथकातील सर्वांनी बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केले होते. पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करताना बॉडी कॅमेऱ्यांचा वापर केला. पोलिसांच्या पथकाने शनिवारी पहाटे तेथे छापा टाकला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, नितीनकुमार नाईक,कल्याणी कासोदे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, पठाण, तांबेकर, रोकडे, रणपिसे यांच्यासह १०० पोलिस कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
पोलाद वितळविण्याच्या ५० भट्ट्या उद्ध्वस्त
एका ठरावीक क्षमतेच्या पोलादापासून ही पिस्तुले बनविण्यात येत होती. पिस्तुलासाठी लागणारे पोलाद वितळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ५० भट्ट्या या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आल्या. अनेक घरांत या भट्ट्या होत्या. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी तेथे ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला. ड्रोनच्या आधारे परिसराची माहिती घेण्यात आली होती.
अशी केली जात होती पिस्तुलांची विक्री
उमराटी गावातील कारागिरांकडून गेल्या काही वर्षांपासून देशी बनावटीची पिस्तुले तयार करून त्यांची विक्री केली जाते. हे कारागीर प्रत्यक्ष पिस्तुले विक्रीसाठी शहरात येत नाहीत. पुण्यातील गुंड टोळ्यांना मध्यस्थांमार्फत पिस्तुलांची विक्री केली जाते. ‘उमराटी शिकलगार ब्रॅँड’ (यूएसए) असा सांकेतिक शब्दाचा वापर करून पिस्तुलांची विक्री केली जाते. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगडमधील सराइतांना पिस्तुलांची विक्री केली जात, असे चौकशीतून समोर आले आहे.
मध्य प्रदेशातील उमराटी गावात देशी बनावटीची पिस्तुले तयार केली जातात, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पिस्तुले तयार करणारे कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. तेथून ३६ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू आहे. शनिवारी पहाटे पोलिसांनी छापा टाकला. रात्री
उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
- सोमय मुंढे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार
..........