पुणे, ता. २५ : रसिकांना खळखळून हसवणारे आणि त्याचवेळी प्रबोधनही करणारे ‘कुटुंब किर्रतन’ हे धमाल नाटक रंगभूमीवर आले आहे. या नाटकाच्या पुण्यातील प्रयोगांना सोमवारपासून (ता. ३१) प्रारंभ होत असून पहिले चार प्रयोग ‘सकाळ’तर्फे प्रस्तुत केले जात आहेत; तर ‘रांजेकर रिअल्टी’ हे सहप्रायोजक आहेत.
संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि अमेय दक्षिणदास लिखित या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, तन्वी मुंडले आणि अमोल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याचे कथासूत्र विनोद रत्ना यांचे असून निर्मिती गौरी प्रशांत दामले यांची आहे. या नाटकाच्या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडे आणि वंदना गुप्ते हे प्रथमच रंगभूमीवर एकत्र काम करत असून तन्वी मुंडले आणि अमेय दक्षिणदास यांचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे.
या नाटकाच्या निमित्ताने संपूर्ण चमूने ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देत संवाद साधला. याप्रसंगी ‘रांजेकर रिअल्टी’चे संचालक रवींद्र रांजेकर उपस्थित होते. कऱ्हाडे म्हणाले, ‘‘या नाटकातील पात्रांची पार्श्वभूमी निमशहरी भागातील आहे. त्यामुळे ही पात्रे त्याच ढंगाची भाषा वापरतात. अर्थात ही गोष्ट शहरातील नसली तरी माणसे आणि त्यांचे स्वभाव तेच असल्यामुळे प्रत्येकाला भावणारी ही गोष्ट आहे. ही गोष्ट रसिकांना हसवेल, पण त्याचवेळी काहीतरी विचारही देऊन जाईल.’’
वंदना गुप्ते म्हणाल्या, ‘‘मी उत्तम संहिता असल्याशिवाय कोणतीही कलाकृती स्वीकारत नाही. या कलाकृतीची संहिता मला मनापासून भावली आणि म्हणूनच मी काम करायला होकार दिला. आजवर केलेल्या कामापेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. या नाटकातही माझी व्यक्तिरेखा एका वेगळ्या धाटणीची आहे. प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा आणि आमचे नाटकही नक्कीच आवडेल.’’
नाटकाचे वेळापत्रक
सोमवार (ता. ३१ मार्च)
वेळ : सायं. ५ वा.
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
शनिवार (ता. ५ एप्रिल)
वेळ : सायंकाळी ५ वा.
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
रविवार (ता. ६ एप्रिल)
वेळ : दु. १२.३० वा.
स्थळ : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
रविवार (ता. ६ एप्रिल)
वेळ : सायं. ६ वा.
स्थळ : अण्णाभाऊ साठे स्मारक, सातारा रस्ता
तिकिटांबाबत....
‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाच्या सोमवारच्या (ता. ३१) प्रयोगाची तिकिटे कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उपलब्ध आहेत. उर्वरित तिन्ही प्रयोगांच्या तिकिटांची विक्री गुरुवारपासून (ता. २७) नाट्यगृहांवर सुरू होणार आहे. तसेच, bookmyshow.com आणि ticketalay.com या संकेतस्थळांवर देखील तिकिटे उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.