पुणे, ता. ७ : एखाद्या विद्यापीठाचा कारभार हा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीनेच पाहायला हवा, विद्यापीठाच्या कामकाजाची संपूर्ण प्रक्रिया माहिती असणारीच व्यक्ती कुलगुरुपदासाठी पात्र असावी. एवढेच नव्हे तर, प्राध्यापकपदासाठी पीएच.डी.धारक असण्यापेक्षा शिकविण्याचे कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची जाण असणारी पात्रता असणाऱ्यांना संधी मिळावी, असे मत शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी मांडले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने कुलगुरुपदाची पात्रता, प्राध्यापक, प्राचार्य निवड प्रक्रियेच्या नव्या नियमावलीचा मसुदा नुकताच जाहीर केला आहे. या मसुद्यातील तरतुदींवर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मते मांडली असून, काही नव्या प्रस्तावित मसुद्याचे स्वागत केले आहे, तर काहींनी प्रस्तावित मसुद्यातील तरतुदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
.........
शिक्षण क्षेत्रात उद्योग, सार्वजनिक प्रशासनातील अनुभवी व्यक्ती ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून चालतात, मग कुलगुरू म्हणूनही त्यांना ग्राह्य धरले जावे. विद्यापीठ अनुदान आयोगाने कुलगुरूंच्या नियुक्तीबाबत आता प्रस्तावित केलेले नियम हे २००६ पूर्वी लागू होतेच, परंतु त्यानंतर ते बदलण्यात आले. एखाद्या संस्थेच्या नियामक मंडळावर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असू शकतात. मग, विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांना संधी मिळायला हवी, हे स्वागतार्ह आहे, परंतु आयोगाने प्राध्यापक भरती प्रक्रियेत प्रस्तावित केलेले बदल हे सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी यापूर्वीच केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोगाने लागू केलेल्या नेट-सेटधारक या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत.
- डॉ. नितीन करमळकर, माजी कुलगुरू
...........
विद्यापीठ अनुदान आयोगाने विशेषत: कुलगुरू नियुक्तीच्या प्रक्रियेत प्रस्ताविक केलेले बदल, हे निश्चितच स्वीकारण्यासारखे अगदीच नाहीत. एखाद्या विद्यापीठाचा कारभार हा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीनेच पाहायला हवा, असे वाटते. कारण शैक्षणिक कामकाज, शैक्षणिक प्रगती ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीलाच योग्य पद्धतीने कळू शकेल. म्हणूनच कुलगुरू नियुक्ती प्रक्रियेत शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना सामावून घेतले जावे.
- डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू
.........
विद्यापीठ अनुदान आयोगाला कोणतीही नवीन नियमावली लागू करायची असेल, तर त्यासाठी सर्व राज्यांमधील विद्यापीठ कायद्यांमध्ये बदल करावे लागतील. नव्या प्रस्तावित नियमावलीमध्ये कुलगुरू नियुक्तीसाठी १० वर्षे अध्यापनाची अट शिथिल केली असून, उद्योग, सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तीलाही संधी देण्याची तरतूद आहे, परंतु विद्यापीठातील अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, प्रशासकीय कामकाज ही प्रक्रिया माहीत असणारीच व्यक्ती ही कुलगुरुपदासाठी पात्र असावी. इतर क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना हे माहिती असेल, असे मानणे शहाणपणाचे नक्कीच ठरणार नाही. असे गृहित धरल्यास विद्यापीठाची वाताहत होईल.
- डॉ. अरुण अडसूळ, माजी कुलगुरू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.