पुणे

समाविष्ट गावांमध्ये महापालिकेने लावले ‘दिवे’

CD

पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २९ : खराब झालेले पथदिवे, नादुरुस्त वायरी, पथदिव्यांची उघडझाप किंवा दिवे वारंवार खराब होण्याचा प्रकार, पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना महापालिका प्रशासनाकडे सतत करावा लागणारा पाठपुरावा, मुख्य रस्ते, परिसर वगळता सार्वजनिक ठिकाणांवर पथदिव्यांचा असलेला अभाव...अशी स्थिती सध्या समाविष्ट गावांमध्ये आहे. एकीकडे गावे महापालिकेत समाविष्ट करून अनेक वर्षे उलटली, मात्र अजूनही शहरासारखा ‘प्रकाश’ गावांमध्ये पडलेला नाही. महापालिकेकडून समाविष्ट गावांच्या विद्युत व्यवस्थेसाठी पुरेसा निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने कामे प्रलंबित राहत आहेत.
महापालिकेच्या हद्दीजवळील ११ गावे २०१७ मध्ये तर २३ गावे २०२१ मध्ये महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली. या ३४ गावांपैकी फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे स्वतंत्र नगरपरिषदेसाठी महापालिकेतून वगळण्यात आली. महापालिकेवरील दोन गावांचा भार कमी झालेला असला, तरीही सोयी-सुविधांबाबत गावे अजूनही वंचित आहेत. शहरानजीक असणारी काही गावे आठ वर्षांपूर्वी तर काही गावे पाच वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झाली. इतक्‍या वर्षांतही पाणी, वीज, रस्ते, ड्रेनेज यांसारख्या किमान सोयी-सुविधादेखील संबंधित गावांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची सद्यःस्थिती आहे. महापालिकेत ही गावे आल्यानंतर पाच ते आठ वर्षांत प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम होण्याची आवश्‍यकता होती.

अशी आहे स्थिती
- ग्रामपंचयतीवेळी बसविलेले विद्युत खांब जुने व खराब अवस्थेत
- खांबांना जोडण्यात येणारी विद्युत वायर, दिवे, जंक्‍शन बॉक्‍स, पोल कव्हरची दुरवस्था
- समाविष्ट गावांमध्ये मुख्य रस्त्यांवर जुने व खराब अवस्थेतील पथदिवे आहेत
- अनेक पथदिव्यांमधील दिवे बंद अवस्थेत किंवा दिवे उघडझाप करत असल्याच्या स्थितीत आहेत
- समाविष्ट गावांचा गावठाणाचा भाग वगळता वाढलेल्या वस्त्या, सोसायट्या, भाजी मंडई, बसथांबे, बहुउद्देशीय सभागृह व त्यांचे परिसर, सार्वजनिक शौचालये, स्मशानभूमी अशा ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही
- नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले जाते
- महापालिकेकडून स्वतः पाहणी करून देखभाल दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार

फक्त कोट्यवधीचा निधी वसूल
महापालिका प्रशासनाकडून मागील दोन वर्षांत समाविष्ट गावांमधून ८१७ कोटी रुपयांचा मिळकतकर वसूल केला आहे. त्या तुलनेत सोयी-सुविधा पुरविण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. २०२१ पासून ते २०२३ पर्यंत दरवर्षी ३२ गावांसाठी अवघी दोन ते पाच कोटी रुपयांची तरतूद करून समाविष्ट गावांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार झाला आहे. मागील वर्षी ही रक्कम किमान दुप्पट करून १० कोटीपर्यंत गेली, तर यंदा ३२ गावांमध्ये विजेचे खांब व पथदिवे या स्वरूपाच्या विद्युत व्यवस्थेसाठी १९ कोटी रुपये महापालिकेने मंजूर केले आहेत. त्यामुळे एका गावाच्या वाट्याला येणाऱ्या निधीमधून तेथील विद्युत व्यवस्थेची किती कामे होऊ शकणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

विद्युत व्यवस्थेसाठी महापालिकेने गावांसाठी दिलेला निधी
वर्ष उपलब्ध करून दिलेला निधी
२०२१-२२ २ कोटी ३८ लाख
२०२२-२३ २ कोटी ७३ लाख
२०२३-२४ ५ कोटी ५५ लाख
२०२४-२५ १० कोटी २९ लाख
२०२५-२६ १७ कोटी ७२ लाख

आकडे बोलतात
- समाविष्ट गावांतील मिळकतींची संख्या - ४ लाख ५५ हजार
- २०२३-२४ मध्ये गोळा केलेला मिळकत कर - ४३९ कोटी ४५ लाख रुपये
- २०२४-२५ मध्ये गोळा केलेला मिळकत कर - ३७७ कोटी ५९ लाख रुपये

मांजरीमधील वस्त्या, सोसायट्यांचा परिसर वाढत असल्याने नवीन पथदिवे बसविण्याची गरज आहे. आता पथदिव्यांची दुरुस्ती महापालिकेकडून होते. परंतु त्यांच्या कामाच्या दर्जाचा प्रश्‍न निर्माण होतो. मांजरी वगळता इतर समाविष्ट गावांमधील विजेचे खांब, पथदिव्यांची अवस्था दयनीय आहे.
- शिवराज घुले, माजी सरपंच, मांजरी

गावात काही ठिकाणी पथदिवे आहेत, तर काही ठिकाणी नाहीत. महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तसेच विद्युतची साधने उपलब्ध असल्यानंतरच कामे केली जातात.
- नितीश लगड, माजी सरपंच, किरकटवाडी

महापालिकेचे पथदिवे काही प्रमाणात आहेत. तसेच विद्युत व्यवस्थेसंबंधी तक्रार केल्यानंतर सतत पाठपुरावा करावा लागतो. त्यानंतर दखल घेतली जाते.
- संदीप लोणकर, माजी सरपंच, केशवनगर

समाविष्ट गावांमधील विद्युत व्यवस्थेसाठी महापालिकेने यंदा १९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दिवाळीनंतर गावांमधील विद्युत व्यवस्थेच्या कामाला सुरुवात होईल.
- मनीषा शेकटकर, प्रमुख, विद्युत विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

Buldhana News: उत्साहाला गालबोट! नदीकाठी आंदोलन पेटलं, स्वातंत्र्यदिनी आंदोलकाला जलसमाधी; जळगावमध्ये नेमकं काय घडलं?

Trump-Putin alaska meeting: ट्रम्प-पुतिन भेट अमेरिका सोडून अलास्कामध्येच का? गुप्त भेटीच्या केंद्रस्थानी भारत

SCROLL FOR NEXT