आकाशदर्शन
- डॉ. प्रकाश तुपे
युरेनस हा सूर्यमालेतील सातव्या क्रमांकाचा ग्रह असून या महिन्यात तो रात्रभर दिसेल. त्याची प्रतियुती २१ नोव्हेंबरला होत असल्यामुळे सूर्यास्तास तो पूर्वेस उगवून रात्रभर आकाशाची फेरी मारून सूर्योदयी पश्चिमेस मावळेल. अंधाऱ्या ठिकाणाहून नुसत्या डोळ्याने त्याचा हिरवट रंगाचा ठिपका दिसू शकेल. मात्र त्याला स्पष्ट पाहण्यासाठी बॉयनॉक्युलर किंवा दुर्बीणीची गरज लागेल. पृथ्वीच्या चौपट आकाराचा हा ग्रह पृथ्वीपासून खूपच दूर म्हणजे सूर्य-पृथ्वी अंतराच्या साडेअठरा पट दूर आहे. तो जवळ-जवळ २७५ कोटी किलोमीटर दूर असल्याने त्याचा प्रकाश आपल्याकडे येण्यास २.६ तास लागतात. या प्रचंड अंतरामुळे तो अवघा ३.८ विकलांएवढा छोटा व ५.६ तेजस्वितेचा दिसेल. या महिन्यात युरेनस वृषभ राशीतील कृत्तीका तारकागुच्छाजवळ दिसेल. वृषभेच्या १३ व १४ क्रमांकाच्या ताऱ्याजवळ तो असून महिना अखेरीस १४ क्रमांकाच्या ताऱ्यालगत युरेनसचा छोटा ठिपका दिसेल.
सिंह राशीच्या उल्का १६-१७ तारखेला पहाटे दिसतील. टेंपल-टटल धूमकेतूच्या अवशेषांमुळे या उल्का दिसतात. दर ३३ वर्षांनी हा उल्कावर्षाव मोठ्या प्रमाणात दिसतो. यंदा मात्र अवघ्या १५ उल्का एका तासात दिसू शकतील. अंधाऱ्या ठिकाणाहून आकाशावर नजर ठेवावी. उल्का सर्वत्र दिसू शकतात, मात्र त्यांचा माग काढल्यास त्या सिंह राशीतून फेकल्या गेल्यासारखे दिसते.
ग्रह :
बुध : गेल्या महिन्याच्या अखेरीस बुध दक्षिण-पश्चिम क्षितीजावर सूर्यापासून दूरात दूर अंतरावर दिसत होता. या महिन्याच्या सुरूवातीपासून तो पुन्हा सूर्याकडे सरकताना दिसू लागेल. महिन्याच्या प्रारंभी सूर्यास्तानंतर सव्वातासाने तो मावळताना दिसेल. त्याची तेजस्विता उणे ०.१ असेल. तो सूर्याकडे सरकत असून आठवड्याभरात त्याची तेजस्विता ०.३ होईल. यावेळी तो ज्येष्ठा ताऱ्याच्या परिसरात असेल. पुढील काही दिवस तो सूर्याकडे सरकत जात संधीप्रकाशात दिसेनासा होईल. त्याची सूर्यबरोबर युती २० तारखेला होईल. सूर्यामागून प्रवास करून बुध पूर्व क्षितीजावर महिना अखेरीस दाखल होईल.
शुक्र : दक्षिणपूर्व क्षितीजावर पहाटे तेजस्वी शुक्र दिसेल. कन्या राशीतील चित्रा ताऱ्याजवळ शुक्र असेल. चित्रेची तेजस्विता फक्त एक असेल तर त्यापेक्षा तेजस्वी असलेल्या शुक्राची तेजस्विता उणे ३.८ असेल. महिन्याच्या प्रारंभी शुक्र साडेपाचच्या सुमारास उगवताना दिसेल व महिनाभरात सूर्याकडे सरकत असल्याने उशीरा-उशीरा उगवत जात महिनाअखेरीस संधीप्रकाशात ६ वाजता उगवेल. दुर्बीणीतून पहाता शुक्राचे बिंब १० विकलांएवढे दिसत असून ते जवळजवळ पूर्ण प्रकाशीत असेल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात क्षितीजाजवळच्या शुक्राजवळ बुध दिसू लागेल. बुध सूर्यामागून प्रवास करून पूर्व क्षितीजावर दिसू लागला आहे. बुध व शुक्र एकमेकांपासून अवघे १.५ अंशावर असतील. मात्र हे युगुल पाहण्यासाठी बॉयनॉक्युलरची मदत लागेल.
मंगळ : गेल्या महिन्याच्या अखेरीपासून बुध व मंगळ एकमेकांलगत दिसत आहेत. या महिन्यात मंगळ सूर्यसानिध्यामुळे दिसणे अवघड ठरेल. बुध हा १२-१३ तारखेस ज्येष्ठेजवळ दिसत असून बुधाच्या जवळच मंगळ दिसेल. एकंदरीतच हे युगुल दिसणे अतिशय अवघड असेल.
गुरू : दक्षिणपूर्व क्षितीजावर मिथून राशीत गुरू दिसत आहे. या राशीच्या प्लव (पोलक्स्) ताऱ्याच्या दक्षिणेस अंदाजे ७ अंशावर गुरू दिसेल. महिन्याच्या प्रारंभी रात्री अकराच्या सुमारास उगवणारा गुरू महिनाभरात दोन तास अगोदरच उगवताना दिसेल. गुरू मिथून राशीत असून पूर्वेकडे सरकताना दिसत आहे. मात्र पृथ्वी वेगाने गुरूला मागे टाकून पुढे जात असल्याने गुरू पश्चिमेकडे सरकल्यासारखे दिसेल. याचाच अर्थ तो १० तारखेपासून वक्री झाल्याचे दिसेल. दुर्बीणीतून पाहता गुरूचे बिंब महिन्याभरात ४० विकलांपासून ४४ विकलांएवढे मोठे झालेले दिसेल. गुरूचे चार मोठे चंद्र २ ते १७ दिवसांत गुरू भोवताली फिरताना ग्रहणे व पिधाने घडवताना दिसतील. चंद्राजवळ गुरू १७ नोव्हेंबरला दिसेल.
शनी : संध्याकाळी दक्षिण-पश्चिम क्षितीजावर पिवळसर रंगाचा शनी दिसेल. तो कुंभ राशीतील उत्तरपूर्व भागात असून मीनपंचकाच्या दक्षिण भागाजवळ दिसेल. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास शनी दिसू लागेल व आकाशात उंच चढत जात रात्री साडेदहाच्या सुमारास ६७ अंश या जास्तीत जास्त उंचीवर दिसेल. त्यानंतर तो रात्री १.४० च्या सुमारास मावळेल. त्याचे बिंब १८.५ विकलांचे दिसत असून त्याची तेजस्विता ०.८ असेल. दुर्बीणीतून पाहता शनीची कडी अजूनही नाजूक अशा रेषेप्रमाणे दिसतील. शनीच्या उत्तरेकडून चंद्र प्रवास करताना २९-३० नोव्हेंबरला दिसेल.
युरेनस-नेपच्यून : युरेनसची प्रतियुती २१ नोव्हेंबरला होईल. नेपच्यून शनीजवळ दिसत असून तो मीन राशीच्या २७ क्रमांकाच्या ताऱ्याजवळ दिसेल. त्याचे २ विकलांचे बिंब ७.७ तेजस्वितेचे दिसेल.