प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ ः राज्य सरकारने ‘पीएम ई-ड्राइव्ह’अंतर्गत ‘पीएमपी’ला देण्यात येणाऱ्या एक हजार ‘ई बस’साठी रिझर्व्ह बँकेला हमी दिली आहे. हमी मिळाल्याने अवजड उद्योग मंत्रालयाने ‘पीएमपी’ला पहिल्या टप्प्यात १२ मीटर लांबीच्या ८०० व ९ मीटर लांबीच्या २०० अशा मिळून एक हजार ‘ई बस’ देण्याचे मान्य केले आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत ‘पीएमपी’ला एक हजार ‘ई बस’ मिळणार असल्याने सुमारे ८ ते १० लाख प्रवाशांची सोय होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
पूर्वी ‘पीएमपी’ला दुसऱ्या टप्प्यात एक हजार बस दिल्या जाणार होत्या, त्यामुळे बस मिळण्यास सुमारे वर्षभराचा कालावधी लागला असता. मात्र, पहिल्या टप्प्यात समावेश झाल्याने आता अवघ्या पाच महिन्यांतच ‘पीएमपी’च्या ताफ्यात एक हजार नवीन बस दाखल होतील.
काय आहे ‘पीएम ई ड्राइव्ह’?
केंद्र सरकारने वाहनाद्वारे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई वाहनांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. देशात सध्या शून्य कार्बन उत्सर्जनवरदेखील काम केले जात आहे. देशात कार्बन उत्सर्जनमध्ये १३ टक्के वाटा हा सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने येत्या पाच वर्षांत हे उत्सर्जन शून्यावर आणण्याचे धोरण आखले आहे. त्याचाच भाग म्हणून ४० लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांचा समावेश ‘पीएम ई ड्राइव्ह’मध्ये करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील पुणे व मुंबईचा समावेश आहे. यात एका बससाठी केंद्राकडून सुमारे ३५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
सध्या ४९० बस
‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या ४९० ई बस आहेत. २०१९ मध्ये या ई बसची खरेदी झाली आहे. २०२९ मध्ये या सर्व बसचे आयुर्मान संपणार आहे. शिवाय दरवर्षी १० वर्षे पूर्ण होणाऱ्या बसला प्रवासी सेवेतून बाहेर जावे लागणार आहे. अशा बसची संख्या २०० आहे. त्यामुळे एक हजार ई बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होत असल्याने बसची संख्या वाढणार आहे. एप्रिल-मे २६च्या दरम्यान या बस ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ‘पीएमपी’ सक्षम होणे आवश्यक आहे. त्याकरिता बसची संख्या वाढविणे अत्यंत गरजेचे होते. एक हजार ई बसला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेला हमी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील ‘पीएमपी’ला बस मिळवून देण्यासाठी आग्रही होते.
- मुरलीधर मोहोळ, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री
राज्य सरकारने बससाठी हमी दिल्याने ई बसचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, पहिल्या टप्प्यातच ‘पीएमपी’ला एक हजार बस मिळणार आहेत.
- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे