पुणे, ता. ६ : ऑक्टोबर महिना ‘ऑक्टोबर हीट’ अर्थात वाढत्या उष्णतेसाठी ओळखला जातो. साधारणपणे या काळात तापमान झपाट्याने वाढून उन्हाचे चटके जाणवतात. मात्र, यंदाचा ऑक्टोबर नेहमीच्या ‘ऑक्टोबर हीट’पासून पूर्णपणे वेगळा ठरला. यंदा हवामानाने अनपेक्षित कलाटणी घेतली. उष्णतेऐवजी शहरांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. परिणामी, नेहमीप्रमाणे ऑक्टोबरमध्ये जाणवणारे उष्णतेचे चटके यंदा जवळपास गायब झाले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
याविषयी हवामान शास्त्रज्ञांशी संवाद साधला असता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वैशाली श्रीपाद यांनी सांगितले की, ‘‘राज्यात ऑक्टोबरमध्ये झालेला पाऊस हा बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील हवामान स्थितीमुळे झाला होता. गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही भागांमध्ये वारंवार कमी दाबाचे क्षेत्र तयार होत होते. बंगालच्या उपसागरात अति कमी दाबाचे क्षेत्र आणि ‘मोंथा’ हे चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे वातावरणात अस्थिरता वाढली होती. त्याच काळात अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. १६ ऑक्टोबर रोजी नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) अधिकृतपणे परतला होता. मात्र, ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय असल्याने दक्षिण भारतात चांगल्या प्रमाणात पावसाचे सत्र सुरू होते.’’
‘‘या प्रणालीचा परिणाम राज्यावरही झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अधूनमधून पाऊस पडत होता. या ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत नीट पोहचत नव्हता, परिणामी कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली. आता मात्र हवामानात हळूहळू बदल होत असून, उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत कमाल आणि किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस इतकी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत राज्यात थंडी जाणवेल’’, असे श्रीपाद यांनी सांगितले.
ऑक्टोबर महिन्यात पाऊस नवीन नाही
ऑक्टोबर महिन्यात पावसाची नोंद होणे नवीन नाही, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांच्या हवामान आकडेवारीनुसार, २०२० हे वर्ष पावसाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरले होते. त्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात तब्बल ३१३.३ मिमी पावसाची नोंद झाली होती, जी मागील दशकातील सर्वाधिक आहे, तर यंदा, २०२५ मध्ये ऑक्टोबर महिन्यात एकूण ६७.३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मागील काही वर्षांतही ऑक्टोबर महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे या महिन्यात पडणारा पाऊस ही काही नवीन किंवा अपवादात्मक गोष्ट नसून, हवामानातील बदलत्या पद्धतीचा एक भाग असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
वर्ष - ऑक्टोबर महिन्यात झालेला पाऊस (मिमी)
२०१४ - २५.९
२०१५ - ७६.७
२०१६ - ८०.४
२०१७ - १८०.९
२०१८ - ३६.१
२०१९ - २३५
२०२० - ३१३.३
२०२१ - १४०.२
२०२२ - ३०३.५
२०२३- १८.६
२०२४ - ६१.२
२०२५ - ६७.३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.