पुणे, ता. ६ : शहरात संपूर्ण ऑक्टोबरमध्ये ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस अशी स्थिती होती, तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येदेखील पावसाची हजेरी कायम होती. मात्र, आता पावसाने संपूर्ण विश्रांती घेतली असून, किमान तापमानात घट नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसांत कमाल आणि किमान तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुण्यात हळूहळू थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
शहर आणि परिसरात गुरुवारी (ता. ६) कमाल तापमान ३०.७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. किमान तापमानात घट झाल्यामुळे पहाटे आणि रात्री काही प्रमाणात गारवा जाणवायला लागला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट होणार असल्याची शक्यता आहे. परिणामी, कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
पुणे आणि परिसरात शुक्रवारी (ता. ७) कमाल तापमान स्थिर राहणार असून, कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे, तर रविवारपासून (ता. ९) कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
महत्त्वाचे
- गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही भागांमध्ये वारंवार कमी दाबाचे क्षेत्र तयार होत होते
- बंगालच्या उपसागरात अतिकमी दाबाचे क्षेत्र आणि ‘मोंथा’ चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे वातावरणात अस्थिरता वाढली होती
- त्याच काळात अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते
- ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय असल्याने दक्षिण भारतात चांगल्या प्रमाणात पावसाचे सत्र सुरू होते
- आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढत आहे
- कमाल आणि किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता