पुणे, ता. ६ : महापालिकेच्या नाट्यगृहांचे आरक्षण पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने करण्याच्या निर्णयाला नाट्य व्यवस्थापक आणि संयोजकांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे गुरुवारी बैठक झाली. यात नाट्यगृहांच्या समस्या सोडविण्यासाठी दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचाही निर्णय झाला.
महापालिकेने यंदा मार्चपासून नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रांच्या आरक्षणासाठी ‘रंगयात्रा’ हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले. मात्र त्यावेळी संपूर्णतः ऑनलाइन आरक्षणाला नाट्य व्यवस्थापक, संयोजक आणि निर्मात्यांनी विरोध केला होता. त्यामुळे पुढील दोन चौमाहींच्या आरक्षणासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन (प्रत्यक्ष) अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र आता संपूर्ण आरक्षण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
या प्रयत्नाला पुन्हा एकदा नाट्य व्यवस्थापक आणि संयोजकांनी विरोध केला आहे. त्यांनी ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेत आक्षेप नोंदवले. या बैठकीला महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, नाट्यगृहांचे प्रशासन अधिकारी राजेश कामठे यांच्यासह मेघराज राजेभोसले, सुनील महाजन, शिरीष कुलकर्णी, मोहन कुलकर्णी, समीर हंपी, सत्यजित धांडेकर आदी उपस्थित होते.
‘रंगयात्रा ॲपची सुविधा निर्माते, व्यवस्थापकांसाठी गैरसोयीची आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये याची अंमलबजावणी होत असताना तेथेही अनेक अडचणी येत आहेत’, अशी तक्रार या व्यवस्थापकांनी केली. या संदर्भात मुंबईतील नाट्य निर्मात्यांसमवेत काही दिवसांनी बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिवटे यांनी दिले.
नाट्यगृहांच्या अडचणीसाठी समिती
या बैठकीत नाट्यगृहांमधील देखभाल, स्वच्छता, सुरक्षा आदींबाबत वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांचाही उल्लेख झाला. त्यानंतर या समस्या गतीने सोडवण्यासाठी ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत नाट्य क्षेत्रातील दोन प्रतिनिधींसह महापालिकेच्या सांस्कृतिक, भवन रचना आणि विद्युत विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असेल. नाट्यगृहातील समस्या वेगाने सोडवण्यासाठी तसेच देखभालीवर देखरेख ठेवण्याचे काम या समितीचे असेल, अशी माहिती सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.