पुणे, ता. १७ ः आपण तुमच्या आर्इ-वडिलांपासून वेगळे राहायचे. त्यांना आपण वृद्धाश्रमात ठेवू, असे म्हणत पतीविरोधात खोट्या तक्रारी देणाऱ्या पत्नीपासून घटस्फोट मिळावा, यासाठी पतीने क्रूरतेच्या आधारावर केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश पी. एम. पाटील यांनी हा निकाल दिला. पत्नीने तिचा मानसिक आजार लपवून लग्न केल्याचेदेखील समोर आले आहे.
सुरेश आणि सुरेखा (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव. त्यांचा २०१६ मध्ये विवाह झाला होता. पती-पत्नी दोघेही खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत आहेत. लग्नानंतर काही दिवसांत दोघांत वाद होऊ लागले. तसेच सुरेखा यांना लहानपणापासून मानसिकदृष्ट्या आजार असल्याचे लग्नावेळी लपविले होते. वैद्यकीय तपासणीतून ही बाब समोर आली. जोडप्यात वाद झाल्यानंतर सुरेखा यांनी आपण तुमच्या आर्इ-वडिलांपासून वेगळे राहायचे. त्यांना आपण वृद्धाश्रमात ठेवू, असा आग्रह सुरेश यांच्याकडे धरला. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. सुरेखा यांनी सुरेश आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात काही तक्रारी दाखल करत सासरच्या मंडळींना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरेश यांनी ॲड. सुनीता जंगम आणि ॲड. यश जंगम यांच्यामार्फत येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. त्यांनी ॲड. तनुजा कुलकर्णी, ॲड. स्मिता भोसले आणि ॲड. शीतल जाधव यांनी या दाव्यात सहकार्य केले.
आर्इ-वडिलांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी
माझे आर्इ-वडील वृद्ध आहेत. यामुळे त्यांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे. या वयात त्यांना आधार देणे गरेजेचे असताना पत्नी त्यांना वृद्धाश्रमात सोडण्याची मागणी करत आहे. ही मागणी मला मान्य नाही. पत्नीने तिचे आजारपण लपवून लग्न केले. तसेच आमची काहीही चूक नसताना खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे म्हणणे पतीने न्यायालयात दाखल केले होते.
एक कोटी रुपये पोटगी देण्याची मागणी
पतीने एक रकमी एक कोटी रुपयांची पोटगी द्यावी, अशी मागणी सुरेखा यांनी केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावत एक रकमी कायमस्वरूपी दोन लाख रुपयांची पोटगी मंजूर केली. तसेच पत्नीने केलेली स्त्रीधन परत मिळण्याची मागणीदेखील न्यायालयाने नामंजूर केली. पत्नीचा नांदायला येण्याचा दावाही फेटाळला आहे.
पत्नीचे आजारपण, तिने दाखल केलेल्या खोट्या तक्रारी याबाबतचे पुरावे आम्ही न्यायालयात सादर केले. त्याचप्रमाणे उच्च व सर्वोच्च न्यायालयाने क्रूरतेच्या आधारे दिलेल्या न्यायनिवाड्यांचा संदर्भ दिला. युक्तिवाद व न्यायनिवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने क्रूरतेच्या आधारावर दाखल केलेला पतीचा अर्ज मंजूर केला.
- ॲड. सुनीता जंगम, ॲड. यश जंगम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.