पुणे, ता. १९ : ‘जीबीएस’ची नवीन रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी मृत्यू होणाऱ्यांची संख्या काहीशी वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत दौंड येथील सदतीसवर्षीय तरुण व मूळची बारामती व सध्या सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीत राहणाऱ्या सव्वीसवर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा ‘जीबीएस’चे उपचार घेत असताना मृत्यू झाला. पुण्यात आतापर्यंत मृतांची संख्या ११ झाली असून, ‘जीबीएस’च्या रुग्णांची संख्या २११ वर पोचली आहे.
दौंड तालुक्यातील सोनवडी येथील सदतीसवर्षीय तरुणाला हातांमध्ये अशक्तपणा आल्याने १० फेब्रुवारीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्याला ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान ‘आयव्हीआयजी’ औषधांचे डोस दिले. त्याचवेळी त्याला ‘जीबीएस’चे निदान झाले. त्याला व्हेंटिलेटर लावले होते. मात्र अर्धांगवायू झाल्याने त्याला मानही धरता येत नव्हती. तसेच फुप्फुसालाही संसर्ग झाला होता. उपचारादरम्यान त्याचा १७ फेब्रुवारीला पहाटे मृत्यू झाला.
मूळची बारामती, तर सध्या नांदेड सिटीत राहणाऱ्या सव्वीसवर्षीय तरुणीला १५ जानेवारीला जुलाबाचा त्रास झाला होता. ती नातेवाइकांकडे राहून पुण्यात ‘मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन’चे शिक्षण घेत होती. कोणतेही औषधोपचार न घेता जुलाबाचा त्रास बंद झाला. त्यानंतर २२ जानेवारीला तिला गिळण्यास, चहा पिण्यास त्रास होऊ लागला. हळूहळू हा त्रास वाढून हाताला अशक्तपणा येऊ लागला. सायंकाळपर्यंत तर तिच्या दोन्ही पायांतील शक्ती गेली. उपचारासाठी आधी तिला सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर २५ जानेवारीला नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले रुग्णालयात दाखल केले. तेथे तिला व्हेंटिलेटर लावले. परंतु, तिचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. जीबीएससह विविध अवयव निकामी होणे, रक्तदाब कमी होणे, असे मृत्यूचे कारण डॉक्टरांनी नोंदविले आहे.
‘जीबीएस’ने झालेले मृत्यू
रुग्ण व वय – पत्ता – मृत्यू दिनांक
१. पुरुष (४०) – डीएसके, धायरी – २५ जानेवारी
२. स्त्री (५६) – नांदोशी, किरकटवाडी – २८ जानेवारी
३. पुरुष (३६) – पिंपळे गुरव – ३० जानेवारी
४. पुरुष (६०) – धायरी – ३१ जानेवारी
५. पुरुष (६०) – वारजे माळवाडी – ३१ जानेवारी
६. पुरुष (६३) – वडारवस्ती, कर्वेनगर – ५ फेब्रुवारी
७. पुरुष (३७) – अप्पर इंदिरानगर – ९ फेब्रुवारी
८. पुरुष (५९) – खडकवासला – ११ फेब्रुवारी
९. पुरुष (३४)– वाघोली – १५ फेब्रुवारी
१०. पुरुष (३७) – दौंड – १७ फेब्रुवारी
११. स्त्री (२६) – बारामती (नांदेड सिटी) – १८ फेब्रुवारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.