सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १९ : फुलांची आकर्षक सजावट केलेले व स्फूर्ती देणारे स्वराज्यरथ...महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके... ५१ रणशिगांची ललकारी...ढोलताशा पथकाचा रणगजर...तुतारीचा ललकार आणि सनई-चौघड्यांचे मंगलमय सूर...अन् पारंपरिक पोशाखात भगवे झेंडे आणि फेटे घालून हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या महिला आणि शिवभक्तांनी केलेला ‘जय शिवाजी...जय भवानीचा जयघोष’...अशा पवित्र वातावरणात बुधवारी पुन:श्च एकदा पुण्यामध्ये शिवकाल अवतरला.
निमित्त होते शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे.
शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींच्या ‘औरंगासूर मर्दानी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य मर्दानी पथका’ने सादर केलेली युद्धकलेची प्रत्याक्षिके शिवभक्तांचे आकर्षण ठरली. या मिरवणुकीत विविध घराण्यांचे ९६ स्वराज्य रथ सहभागी झाले होते. सकाळी सुरू झालेली ही मिरवणूक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
सोहळ्याचे उद्घाटन शिवरायांचे वंशज श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलिस उपायुक्त संदीप गिल, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील मॉसाहेब जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीतील मुख्य रथ असलेल्या ‘जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत’ रथावरील शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे यंदा तेरावे वर्ष आहे.
यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. शिवाजी महाराजांचा ऐक्याचा विचार आजही पाहायला मिळत आहे. पुण्यात शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येत आहेत. यानिमित्ताने शिवरायांसोबत असलेले सरदार, मावळे यांचे स्मरण होते.’’
मोहोळ म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता त्यावेळी प्रत्येक पायरीवर त्यांना स्वराज्यातील सरदार व मावळ्यांची आठवण झाली. स्वराज्य स्थापनेमध्ये शिवरायांसोबत असलेले सरदार व मावळे यांचे स्मरण या सोहळ्याच्या निमित्ताने केले जात आहे.’’
हेलिकॅाप्टरमधून पुष्पवृष्टी
शिवाजीनगर येथील ‘एसएसपीएमएस’ संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारूढ स्मारकावर हेलिकॅाप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड आणि ईशान गायकवाड म्हणाले, ‘‘शिवरायांच्या विश्वातील पहिल्या स्मारकावर १४ वर्षे पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. पुणेकर भाग्यवान आहोत. करवीर संस्थानाचे राजर्षी शाहू छत्रपती आणि त्यांचे पुत्र राजाराम छत्रपती यांनी शिवरायांचे हे स्मारक निर्माण केले. शिवरायांचा एकसंध ओतीव काम केलेला हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य पुतळा आहे. १६ जून १९२८ रोजी या स्मारकाचे अनावरण झाले होत. पुतळ्याचे वजन तब्बल ८००० किलो आहे. शिवरायांच्या चित्तथरारक इतिहासासारखाच या स्मारक निर्मितीचा इतिहास ही चित्तथरारक आहे.’’
वादक, बालकीर्तनकार
या मिरवणुकीत विविध घराण्यांच्या रथांवर देखावे केले होते. एका रथाच्या पुढे उज्जैनवरील महाकालचे वाद्यपथक आले होते. त्यांच्या सादरीकरणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. तसेच आळंदीतील हरिपाठ शाळेतील बालवारकरी टाळ-मृदंगांच्या तालावर भजन, अभंग म्हणत होते. त्यांच्याभोवतीही नागरिकांची गर्दी झाली होती. एका रथाच्या पुढे मल्लखांबावरील प्रात्यक्षिके सादर करण्यात येत होती.
पारंपरिक वेश
या मिरवणुकीत महिला आणि युवतींचा सहभाग लक्षणीय होता.
पारंपरिक वेशात त्या आल्या होत्या. तर, पुरुष फेटे आणि पारंपरिक वेशात होते. नातेवाइकांसोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांची लगबग सुरू होती. लहान मुलांनाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव करण्यात आला होता.
स्वागत कक्षांची संख्येत वाढ
मिरवणुकीदरम्यान विविध संघटनांतर्फे स्वराज्य रथांचे स्वागत करण्यात येत होते. त्यांच्यासाठी पाणी, जेवण, न्याहरी, चहा, सरबत आदींची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा स्वागत कक्षांची संख्येत वाढ झाली होती.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.