पुणे, ता. २७ : राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे हौशी पण अनुभवी कलाकारांचे व्यासपीठ. ही स्पर्धा खुली असल्यामुळे अनेक ज्येष्ठ कलाकार यात नियमितपणे सहभागी होत असतात. मात्र तरीही या स्पर्धेत पुण्यातील एका महाविद्यालयाच्या संघाने सहभाग घेतला; विभागीय फेरीत प्रथम पारितोषिक पटकावले अन् अंतिम फेरीतही पुण्याचे प्रतिनिधित्त्व करताना सांघिक द्वितीय पारितोषिकासह पाच वैयक्तिक पारितोषिके पटकावली.
या महाविद्यालयाचे नाव आहे, मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय आणि त्यांनी सादर केलेल्या नाटकाचे नाव आहे, ‘मून विदाउट स्काय’. या नाटकाला राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६३ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. रोख रक्कम, चार लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
सांघिक पारितोषिकांसह या नाटकाला पाच वैयक्तिक पारितोषिकेही मिळाली. यात मुकुल ढेकळे यास दिग्दर्शनासाठी द्वितीय पारितोषिक, निखिल मारणे यास प्रकाशयोजनेसाठी प्रथम पारितोषिक आणि सुमित शेलार यास नेपथ्यासाठी प्रथम पारितोषिक मिळाले आहे तर, प्रणव सपकाळे आणि मानसी गोसावी यांना अभिनयासाठीचे प्रथम पारितोषिक अर्थात उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक जाहीर झाले आहे.
या नाटकाची संहिता प्राजक्त देशमुख यांची आहे. हिटलरने केलेल्या ज्यूंवरील अन्यायाच्या पार्श्वभूमीवर या नाटकातील कथा आकारास येते. छळछावणीकडे जात असलेल्या एका रेल्वेच्या डब्यातील प्रवाशांचे अंधकारमय भवितव्य, बाहेरील सामाजिक-राजकीय अशांततेमुळे त्यांच्यात निर्माण झालेला संघर्ष या नाटकातून उलगडतो. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक उलथापालथीत मध्यमवर्गीय नागरिकच कसे भरडले जातात, हे या नाटकातून दिग्दर्शकाने अधोरेखित केले आहे.
राज्य नाट्य स्पर्धेत अनेक अनुभवी कलाकार सादरीकरण करत असतात. अशावेळी आपला त्यात निभाव लागेल का, याची चिंता होतीच. पण पुणे विभागीय अंतिम फेरीत अव्वल ठरल्यानंतर आमच्यात आत्मविश्वास आला आणि त्या बळावर अंतिम फेरीत दमदार सादरीकरण केले. आम्हाला आमचे काहीतरी म्हणणे मांडायचे आहे, या भावनेतून आम्ही नाटक करत आहोत.
- मुकुल ढेकळे,
‘मून विदाउट स्काय’ नाटकाचा दिग्दर्शक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.