पुणे, ता. ११ : बहुप्रतीक्षेत असणाऱ्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षा २०२५’च्या निकालाची कार्यवाही सुरू आहे. निकालासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत अधिकृत संकेतस्थळावर लवकरच माहिती देण्यात येईल, असे राज्य परीक्षा परिषदेने सांगितले आहे. परीक्षा परिषदेच्या या संदर्भातील परिपत्रकामुळे ‘टेट-२०२५’च्या निकालासाठी विद्यार्थ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे मे-जून २०२५ मध्ये ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा’ (टेट) घेण्यात आली. राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये एकूण ६० परीक्षा केंद्रांवर आठ दिवसांमध्ये प्रतिदिन तीन सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी एकूण दोन लाख २८ हजार ८०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ११ हजार ३०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बी.एड आणि डी.एल.एडच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टेट परीक्षा देण्याची संधी यंदा उपलब्ध करून देण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र राज्य परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या तारखेपासून कमाल एका महिन्याच्या कालावधीत सादर करणे अनिवार्य होते. या व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने ‘टेट २०२५’ परीक्षेचा निकाल लावण्यासाठी आवश्यक माहिती प्राप्त करण्यात आणि एकत्रित होण्यास वेळ लागत आहे. राज्यात डी.एल.एड परीक्षेचा निकाल पाच ऑगस्ट रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ‘टेट-२०२५’च्या निकालाची कार्यवाही सुरू आहे. हा निकाल लवकरच राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
निकाल न लावल्यास आंदोलन
‘‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ‘टेट’ परीक्षेचे आयोजन करतानाच नियोजनशून्य काम केले आहे. परीक्षा परिषदेने तीन जून रोजी डी.एड आणि बी.एड पात्र उमेदवारांना संधी दिली. ‘टेट’ परीक्षेत प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाही, असे सांगून परीक्षा परिषद विविध प्रकारे परिपत्रके काढत आहे. खरंतर टेट परीक्षेचा निकाल लावण्यास विलंब होत असून या विलंबाचे कारण न देता या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी अन्य कारणे पुढे केली जात आहेत. परिणामी ‘टेट-२०२५’ ही परीक्षा दिलेल्या तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. परीक्षा परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळेच हे घडत आहे. परीक्षा परिषदेने ‘टेट २०२५’ परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यापर्यंत न लावल्यास राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल,’’ असा इशारा युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.