पुणे, ता. ११ : सदनिकेची खरेदी-विक्री, बक्षीस पत्र, मृत्यू, वारसा आदी कारणांमुळे मिळकतीच्या मालकी हक्कात बदल होत असतो. तसाच बदल वीजग्राहकाला त्याच्या वीजबिलावरील नावातही करावा लागतो. ‘नावात बदल’ करण्यासाठी वीजग्राहकांना आता घरबसल्या व ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. महावितरणच्या मोबाईल ॲपवर व wss पोर्टलवर ही सुविधा २४ तास उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महावितरणच्या बहुतांश ग्राहक सेवा मोबाईल ॲप व संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ग्राहकाला स्वतःचा ‘यूजर नेम’ आयडी तयार करून घरबसल्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येतो. नवीन जोडसाठी अर्ज करणे, वीजबिल पाहणे, भरणे, तक्रारी नोंदवणे, त्याचा पाठपुरावा करणे, रीडिंग नोंदवणे, वीजबिल भार कमी/जास्त करणे, जुन्या बिलांचा इतिहास, बिल कॅलक्युलेटर यांसह नावात बदल करणे ही प्रमुख सुविधादेखील मोबाईल ॲप तसेच https://wss.mahadiscom.in/wss/wss या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यामध्ये आता ही सुविधादेखील मिळणार आहे.
महावितरणचे राज्यभरात सुमारे तीन कोटींहून अधिक ग्राहक आहेत. तसेच दरवर्षी काही लाख ग्राहकांची भर त्यात पडते. खरेदी-विक्री, बक्षीस पत्र, मृत्यू, वारसा, विभक्त कुटुंब पद्धती आदींमुळे मिळकतीचे नावे बदल असतात. मालकी हक्कात नाव बदलल्यास इतर विभागाप्रमाणे वीजबिलाच्या नावात बदल करणेही गरजेचे असते. त्यासाठी पूर्वी कार्यालयात जाणे अपरिहार्य होते. विविध अर्जासोबत ‘प्रपत्र उ’ भरावे लागत होते; तर पुराव्यासाठी बरीच कागदपत्रे जोडावी लागायची. ‘प्रपत्र उ’ मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे. मिळकतीचे नाव बदलल्याचा पुरावा व सुरक्षा ठेव नवीन ग्राहकांच्या नावे करण्यासाठी ‘Form X’ याचा फोटो काढून अपलोड केला की नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होते. येणाऱ्या बिलामध्ये नाव बदलून येणार आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
ॲप नोंदणी कशी कराल?
महावितरण ॲप इन्स्टॉल केल्यास सर्वप्रथम भाषा निवडावी. नोंदणी करण्यासाठी सदस्य बना/Don’t have account sign up वर क्लिक करावे. त्यानंतर १२ अंकी वीजग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक, इमेल, प्रवेशाचे नाव (Login ID) व पासवर्ड टाकून नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर login केल्यास सर्व परवानग्या (permissions) स्वीकाराव्यात म्हणजे आपले ॲप विनासायास काम करू शकेल.
नावात बदल करण्यासाठी...
ॲपच्या डाव्या कोपऱ्यात सेवांची लिंक दिली आहे. त्यात बरेच पर्याय आहेत. पैकी ‘नाव बदलाची मागणी’ पर्याय निवडावा. ग्राहक क्रमांक निवडल्यास ‘प्रपत्र उ’ येते. बदल करावयाची किंवा नवीन मालकाची माहिती भरावी. बदलाचे कारण निवडून अटी मान्य कराव्यात व पुढे जाऊन मिळकतीचा पुरावा व Form x चा फोटो काढून अपलोड करावा. माहिती अपलोड होताच नोंदणी क्रमांक मिळतो.
मोबाइल ॲप व संकेतस्थळाच्या माध्यमातून महावितरणने ग्राहकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. वीजग्राहकांनी घरबसल्या या सेवांचा लाभ घेऊन आपले श्रम व वेळ वाचवावा.
- सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण, पुणे परिमंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.