पुणे, ता. १४ : नवं काहीतरी शिकण्याची आस अनेक अडचणींवर मात करत असते. दृष्टी नसली तरी स्वप्नांच्या आकाशाला गवसणी घालण्याची त्यांची उमेद डोळस आहे. स्पर्शातून अक्षरे...श्रवणातून उच्चार आणि मनातून अर्थ ओळखत तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी जर्मन ही परदेशी भाषा शिकण्याच्या नव्या वाटेवर पाऊल टाकलं आहे. होय, आता या विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन, परकीय भाषेच्या अनोख्या प्रवासास ‘डोळस’ सुरवात केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेचा आठ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येतो. यंदा या अभ्यासक्रमास नऊ दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांनाही जर्मन भाषा शिकता यावी, यासाठी जर्मन भाषा विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आला. विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातील जर्मन भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती आचार्य म्हणाल्या,‘‘दृष्टिहीन विद्यार्थ्यांना विशिष्ट शिक्षण प्रणालीद्वारे जर्मन भाषेचे ज्ञान दिले जात आहे. यात ध्वनीच्या साहाय्याने भाषा शिकविणे, त्यानंतर ब्रेलसह अन्य माध्यमातून भाषेची ओळख, संवाद साधण्याचे कौशल्य शिकविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. एकांश ट्रस्टच्या अनिता अय्यर यांच्यामार्फत या नऊ विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्यात आले आहे. आठवड्यातून तीन दिवस चालणाऱ्या या अभ्यासक्रमात एकूण ५० विद्यार्थी असून, त्यात नऊ विद्यार्थी हे दृष्टिहीन आहेत.’’
‘‘जर्मन भाषा आली, की जर्मन कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यातून चांगल्या प्रकारे करिअर करणे शक्य आहे, हे या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणूनच परकीय भाषा शिकण्याचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे,’’ असेही आचार्य यांनी सांगितले.
....................
विविध क्षेत्रात संधी
बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) बी. कॉमच्या द्वितीय वर्षात शिकत असणारा मारुती कांबळे म्हणतो, ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. याबद्दल मित्रांकडून माहिती मिळाली होती. जर्मन भाषा शिकल्यानंतर भाषांतर, बॅंकिंग अशा विविध क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. म्हणून हे शिक्षण घेणे महत्त्वाचे वाटते.’’
.............
जर्मन भाषा अवगत करणार
बीएमसीसीमध्ये बी.कॉमच्या द्वितीय वर्षाला असणारी गीतांजली ढोबे म्हणते,‘‘लहानपणापासूनच परदेशी भाषा शिकावी, असे स्वप्नं होते. म्हणूनच बी.कॉमच्या प्रथम वर्षाला मी जर्मन भाषा विषय घेतला होता. त्यानंतर या भाषेत आणखी अभ्यास करायची इच्छा होती, म्हणून प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. यापुढे जर्मन भाषेतील विविध परीक्षा देऊन ही भाषा अवगत करण्याचा मानस आहे.’’
फोटोः 40165
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.