पंढरपूर वारी हा महाराष्ट्राच्या वैभव संपन्न परंपरेतील मोठा ठेवा आहे. वारकरी संप्रदायाची तात्त्विक पायाभरणी ज्ञानेश्वरांनी केली. विठ्ठल भक्तिभोवती वारकरी संप्रदायाची गुंफण झाली आहे. वारीचा भक्ती सोहळा म्हणजे भक्तीला आलेला महापूर होय, असे वारीचे वर्णन करता येईल.
- डॉ. अरविंद नेरकर
वारकरी संप्रदायातील पालखी सोहळा हा महत्त्वाचा भक्तिसोहळा आहे. आळंदी, देहूवरून निघून ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता पंढरीची वाट चालतात. दुष्काळ, महापूर, पाऊस किंवा समाजजीवन, राजकारण आणि परिस्थितीतील बदलामुळे वारीत कोणताही फरक झालेला नाही. आत्मज्ञानविरहित आंधळ्या कर्माचरणाचा काही उपयोग नसल्याचे ज्ञानदेव निक्षून सांगतात. भक्तियोगाचे श्रेष्ठत्व हे वारकऱ्यांना ज्ञानदेव-नामदेवांसारख्या संतांनी कीर्तनातून जनमानसावर ठसविले. तत्कालीन समाजजीवनावर त्याचा निश्चित प्रभाव पडला असावा. कारण त्यानंतर वारकरी आचरण करण्याची परंपरा निर्माण झाली. शुद्ध अंतःकरण, नीतिमत्तेची जपणूक हे परमार्थाचे सूत्र असल्याचे या संप्रदायाने सांगितले आहे. समता, बंधुभावाची शिकवण या संप्रदायाने दिली.
वारकरी पंथाने लोकांच्या मनावर नीतीने वागण्याचे उत्कृष्ट संस्कार केले आहेत. परद्रव्य, परनारी वर्ज्य ही या पंथातील शिकवण आहे. परद्रव्यविषयी अनासक्तीचा विचार मांडणाऱ्या वारकरी संप्रदायाने रखुमाई मातेसमान असल्याबद्दलचा स्त्रीविषयी मंगल विचार मांडला.
वारकरी संतांनी जो भक्तिसंप्रदाय निर्माण केला त्यात अभंग, ओवी या वाणीतून आध्यात्मिक समतेची भूमिका घेतली होती. त्याच्या भक्तियोजनेप्रमाणे ईश्वराची अर्थात पांडुरंगाची भक्ती करण्याचा सर्वांना अधिकार आहे.
नामस्मरणाने, भक्तिमार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचता येते. राम कृष्ण हरी या नामजपाचा विचार रुजवितात. ज्ञानदेवांनी कर्मकांडाला वगळून
ईश्वरप्राप्तीचा नवीन व सोपा मार्ग सामान्यजनांना दिला. सर्वजणांना सामावून घेणारा नवा श्रद्धाळू भाविकांचा समूह निर्माण केला.
वारकरी संतांनी आणि त्यानंतर सांप्रदायिकांनी मनामनांची मशागत करणारा हा संप्रदाय अखंड कार्यरत ठेवला आहे. ईश्वरनिष्ठा, सत्यनिष्ठा, ज्ञानोपासना, कर्तव्याचरण, माता-पिता आचार्य यांचा गौरव शीलरक्षण यासारखी श्रेष्ठ जीवनमूल्ये वेद-उपनिषद कालापासून चालत आली आहेत. ज्ञानेश्वर आणि समकालीन संतांनी या मूल्यांचा आग्रह धरला. त्यानंतरही ही मूल्ये संत विचारातून जपली.
भजन, कीर्तन, नामस्मरणाबरोबर आपण सारे एक आहोत, हा एकोप्याचा विचार वारीमध्ये अनुभवताना भेदाभेदांची आवरणे गळून पडतात. जीवन जगण्याचा मार्ग गवसतो. सदाचरण नीतिमूल्यांवर आधारित वर्तन संतुष्टता, सात्त्विक विचाराबरोबर सात्त्विक आहार यांसारख्या कृती कराव्यात, असं वाटणं म्हणजे वारीची फलश्रुती.
ज्ञानेश्वरीविषयी संत नामदेवांनी म्हटले आहे की, ‘एक तरी ओवी अनुभवावी’. ज्ञानेश्वर माऊलींच्या दरवर्षी निघणाऱ्या वारीविषयी म्हणावसं वाटतं...
एक तरी वारी आचरावी..!
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.