पुणे, ता. २२ : ‘‘मायबापापुढे करावा नमस्कार। तेणें चुकती संसारी व्यवहार॥’’ किंवा ‘‘मायबाप पुढे वंदावी। सुखाची सेज जणू घडावी॥’’, अशा शब्दांत संत साहित्याने आणि लोकपरंपरेने आई-वडिलांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. याच शिकवणीचे स्मरण करत आई-वडिलांच्या सेवेचा संकल्प पुणेकरांनी केला. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्यांच्या साक्षीने आणि वैष्णवांच्या साथीने ‘साथ चल’ उपक्रमात रविवारी आई-वडिलांच्या सेवेची शपथ घेण्यात आली. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित या उपक्रमात जणू आनंदाला उधाण आले होते.
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पुण्यातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी सकाळी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. या पालखी मार्गावर पुलगेट येथील महात्मा गांधी बस स्थानक परिसरात ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे ‘साथ चल’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात समाजातील सर्व घटकांतील प्रतिनिधी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या उपक्रमात सहभागी होत पुणेकरांनी जणू आषाढी वारीत सहभागी होता न आल्याची खंत दूर केली.
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मवर्ष यंदा साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘वारी विठुरायाची, आई-वडिलांच्या सेवेची’ अशी यंदाच्या उपक्रमाची संकल्पना होती. पालखी सोहळ्यातील वारकरी आणि उपक्रमात सहभागी झालेल्या पुणेकरांनी आई-वडिलांच्या सेवेची शपथ घेतली. याप्रसंगी आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त ॲड. रोहिणी पवार, आमदार हेमंत रासने, मोहन जोशी, रवींद्र माळवदकर, प्रदीप देशमुख, महेंद्र कांबळे, मुकुंद किर्दत, कादंबरी शेख यांच्यासह राजकीय, सामाजिक, उद्योग, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मार्गस्थ होत असताना उपस्थितांनी विठ्ठलाचा आणि संतांचा नामघोष केला. भाविकांनी पालख्यांचे मनोभावे दर्शन घेतले, तसेच वारकऱ्यांसमवेत काही पावले चालत वारी अनुभवण्याचा प्रयत्न केला.
विठ्ठलभक्तांचा मेळा
दरवर्षी होणाऱ्या या उपक्रमाची उत्सुकता असल्याने पहाटेपासूनच बसस्थानकाच्या परिसरात विठ्ठलभक्तांचा मेळा जमण्यास सुरुवात झाली होती. धोतर, कुर्ता, टोपी अशा वेशात पुरुष आणि नऊवारी, नथ अशा वेशात महिला सजल्या होत्या. कपाळी चंदनाचा टिळा आणि मुखी हरिनामाचा जयघोष करत सारे ‘विठ्ठल’ नामाचा जयघोष करत होते. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पावसाने विश्रांती घेतली असली तरी आल्हाददायक गारव्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न झाले होते.
फुगड्यांचा फेर अन् भजनाचा आनंद
टाळ-मृदंगाच्या साथीने भजनात तल्लीन झालेल्या वैष्णवांच्या आनंदात सहभागी होण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. तसेच, डोक्यावर तुळशी वृंदावन घेत मृदंगाच्या तालावर पुणेकरांनी दिंडीत फेर धरला आणि वारकऱ्यांच्या साथीने फुगड्यांचाही फेर धरला.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘साथ चल’ उपक्रमाची संकल्पना अतिशय स्तुत्य आहे. यंदा संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मवर्ष साजरे होत असून गोकुळाष्टमीला आळंदीत भव्य रथोत्सव होणार आहे. या रथोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मी करते.
- ॲड. रोहिणी पवार,
विश्वस्त- संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.