पुणे, ता. ५ : तब्बल आठशेहून अधिक दालनांचा मंडप...बालगोपाळांच्या सृजनशीलतेला चालना देणारा ‘चिल्ड्रेन कॉर्नर’, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाची मांदियाळी...चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद देण्यासाठी ‘फूड कोर्ट’ असा पुणे पुस्तक महोत्सवाचा दिमाखदार भव्य मंडप उभारणीच्या कामाला वेग आला आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हा भला मोठा मंडप उभारला जात आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात आतापर्यंत आठशेहून अधिक दालनांची नोंद झाली आहे. पुस्तक प्रकाशकांच्या दालनांसाठी मंडप उभारला जात आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाच्या आदल्यादिवशी म्हणजेच १२ डिसेंबरला ऑनलाइन सोडत पद्धतीने प्रकाशकांना स्टॉलचे वाटप केले जाणार आहे. या दालनांचे कलर कोडिंग करण्यात येईल. वाचकांकरिता प्रवेशद्वारावर त्याची माहिती उपलब्ध असेल. मंडपात इंटरनेट-वायफायची सुविधा, आसन व्यवस्था, पिण्यासाठी पाणी, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पुस्तकांची प्रकाशने आणि लेखक-वाचक संवादासाठी जागा उपलब्ध असणार आहे.
महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर शनिवारवाड्याचे प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि पुस्तकरूपी बुरूज असणार आहेत. ‘चिल्ड्रेन कॉर्नर’मध्ये लहान मुलांसाठी चित्रकला, शिल्पकला, लेखन-अभिनय अशा विविध कला-साहित्य-संस्कृती-अध्ययनाचे धडे देणाऱ्या कार्यशाळा रंगणार आहेत. ‘पुणे लिट फेस्ट’ची पर्वणी यंदा अॅम्फी थिएटरमध्ये सहा दिवस साहित्यप्रेमींना अनुभवता येईल. ‘फूड कोर्ट’मध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना ‘लाइव्ह म्युझिक’ ऐकता येणार आहे.
महोत्सवात होणार पुस्तकांची प्रकाशने
पुणे पुस्तक महोत्सवाच्या संयोजन समितीने महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रकाशकांची शुक्रवारी बैठक झाली. महोत्सवात व्यावसायिक म्हणून सहभागी होतानाच सामाजिक भान जपण्याचे आवाहन महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संयोजिका बागेश्री मंठाळकर, ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात काही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी येत्या सोमवारपर्यंत (ता. ८) पुस्तके, ग्रंथांच्या दोन प्रती महोत्सवाच्या कार्यालयात जमा कराव्यात. उपसमितीमार्फत या पुस्तक-ग्रंथाचे परीक्षण केल्यानंतरच त्याची प्रकाशनासाठी निवड होईल, असे महोत्सवाच्या संयोजकांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.