महिमा ठोंबरे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ८ ः पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आल्यानंतर नव्या कार्यकारिणीने संमेलनाच्या स्वरूपात बदल करण्याचे जाहीर केले होते. साताऱ्यातील ९९ व्या साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका पाहून यातील काही बदलांची नांदी झाल्याचे दिसत आहे. अन्य भाषेतील साहित्यिकांच्या हस्ते उद्घाटन, ग्रंथ प्रदर्शनातून खाद्यपदार्थांचे स्टॉल वगळणे, समकालीन पुस्तकांवर चर्चा अशी पावले महामंडळाने उचलली आहेत.
साहित्य संमेलनाच्या स्वरूपावरून गेली काही वर्षे नाराजी व्यक्त केली जात होती. तेच ते विषय, नेहमीचेच वक्ते, राजकारण्यांची उदंड गर्दी, ग्रंथ प्रदर्शनाला मिळणारे दुय्यम स्थान, समकालीन साहित्य व्यवहाराला स्थान नसणे, अशा अनेक त्रुटी संमेलनात दिसून यायच्या. यातील बऱ्याचशा त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीने केला आहे.
संमेलनाच्या उद्घाटनाला अन्य भारतीय भाषांमधील साहित्यिकांना बोलावण्याची परंपरा वर्ध्यातील साहित्य संमेलनापर्यंत सुरू होती. मात्र, अमळनेर आणि दिल्ली अशा मागील दोन साहित्य संमेलनांमध्ये या परंपरेला फाटा देण्यात आला. यावेळी मात्र संमेलनाचे उद्घाटनच ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून, समारोपालाही ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात आले असले तरी उद्घाटन साहित्यिकाच्याच हस्ते करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
गेल्या काही संमेलनांमध्ये ग्रंथ प्रदर्शनांना योग्य स्थान दिले जात नव्हते. ग्रंथ प्रदर्शनाचा मांडव मुख्य मांडवापासून दूर असे. यंदा मात्र संमेलनात जाण्याचा मार्गच ग्रंथ प्रदर्शनातून जाईल, अशी आखणी करण्यात आली आहे. तसेच, ग्रंथ प्रदर्शनातच मांडण्यात येणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल यंदा वगळण्यात आले असून, त्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संमेलनाच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच होणार असल्याने ग्रंथ प्रदर्शनासाठी एक अतिरिक्त दिवस मिळणार आहे. ग्रंथदिंडी आणि ध्वजवंदनही आदल्या दिवशी होणार असल्याने उद्घाटनापूर्वीची धावपळ संपणार आहे.
----
तोचतोचपणा टाळण्याचा प्रयत्न
संमेलनामधील परिसंवादाचे तेच-ते विषय आणि तेच वक्ते टाळण्यासाठी यंदा महामंडळाने सर्व घटक संस्थांना थेट मागील तीन वर्षांची पत्रिका पाठवत त्यातील विषय व वक्ते वगळून अन्य नावे सुचवण्यास सांगितले. त्यामुळे यंदाच्या परिसंवादांच्या विषयांमध्ये नावीन्य असून, वेगळे वक्ते ऐकायला मिळणार आहेत. संमेलनात पहिल्यांदाच समकालीन पुस्तकांवर चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने गेल्या काही काळात साहित्य विश्वात गाजलेल्या पुस्तकांना संमेलनात स्थान मिळाले आहे.
----
‘‘साहित्य संमेलन हा भाषेचा सर्वात मोठा उत्सव आहे. त्यामुळे संमेलनाकडून अनेक अपेक्षा असतात. सगळ्याच पूर्ण करता येणे शक्य नसले तरी अधिकाधिक त्रुटी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. संमेलन हे साहित्यकेंद्री आणि वाचकाभिमुख असावे, यादृष्टीने आम्ही पावले उचलली आहेत. तरुणाईचा सहभाग वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ः-प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.