‘‘श्रमिकांचे ‘बाबा’ अर्थात कष्टकरी, कामगारांचे नेते, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक चळवळींचा आधारवड हरपला. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींची भरून काढता येणार नाही, अशी मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या सामाजिक चळवळींचा वारसा पुढे नेण्यासाठी अखंड आणि व्रतस्थपणे क्रियाशील राहणाऱ्यांमध्ये बाबा आढाव अग्रभागी राहिले. व्यवसायाने डॉक्टर असूनही बाबांनी संपूर्ण आयुष्य असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी वेचले. आपल्या तत्त्वांशी ठाम असणाऱ्या बाबांची विचार मांडण्याची शैली परखड होती. त्यांचे निधन अशा अनेक उपक्रम, सामाजिक चळवळींना, त्यातील कार्यकर्ते यांना पोरके करून गेले आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
---------------
‘‘समाजकारणातील निस्पृहता, तळमळ आणि अत्युच्च प्रामाणिकतेचे प्रतीक असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला. विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. सत्यशोधक चळवळीचा विचार आपल्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपला. समाजातील सर्वात तळातील घटकाला न्याय मिळवून देणे, हाच त्यांचा ध्यास होता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रगत, विचारशील चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून, महाराष्ट्राने समाजसेवेचा महान तपस्वी गमावला आहे,
-अजित पवार, उपमुख्यमंत्री.
‘‘महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ, वंचित आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणून त्यांच्या न्यायासाठी अखंडपणे आयुष्य अर्पण करणारे ज्येष्ठ समाजसेवक, सत्यशोधक विचारसरणीचे निष्ठावान अनुयायी व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक समतेच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे. नव्वदी पार केल्यानंतरही, अखेरच्या श्वासापर्यंत सामाजिक न्यायासाठी आणि श्रमजीवींच्या हक्कांसाठी सक्रियपणे आवाज उठवणाऱ्या डॉ. बाबा आढाव यांच्या कार्याच्या रूपाने त्यांच्या स्मृती महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
----------
डॉ. बाबा आढाव यांचे पुणे शहरासाठी अत्यंत मोलाचे योगदान होते. समाजवादी नेता, मानवतावादी विचारवंत आणि रिक्षाचालक, हमाल, मोलमजुरी करणारे असंघटित कामगार यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. महापालिकेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याचा पुण्यावर दीर्घकालीन आणि सकारात्मक प्रभाव राहिला आहे. पुण्यातील असंघटित कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना मिळण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. त्यांच्या निधनाने पुणेकरांची अपरिमित हानी झाली आहे. मी नगरसेवक, महापौर असताना विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली, मार्गदर्शनही मिळाले होते.
-मुरलीधर मोहोळ,
केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
---------------------
श्रमिकांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे बाबा आढाव यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. साधेपणा, तत्त्वनिष्ठा आणि न्यायासाठीच्या अविचल संघर्षामुळे ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या कार्यातून उभारलेली सहकार आणि श्रमिक चळवळ ही आपल्या समाजाची अमूल्य संपदा आहे. त्यांच्या निधनाने श्रमिक चळवळीचे एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले.”
माधुरी मिसाळ,
नगरविकास राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
-------------
‘‘बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालील हमाल पंचायत आणि ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’ यांचे संबंध आगळेवेगळे, परस्पर विश्वासावर उभे होते. कामगारांच्या हितासाठी त्यांची असलेली तळमळ, सातत्याने न्याय मिळवून देण्याची धडपड आणि मुद्देसूद भूमिका खरोखरच वाखाणण्याजोगी होती. व्यापारी आणि कामगार यांचा संबंध अनेकदा संघर्षमय असतो, पण बाबांच्या समतोल दृष्टिकोनामुळे हा संघर्ष कधीही टोकाचा गेला नाही. त्यांनी संवाद, पारदर्शकता आणि परस्पर आदर या तीन सूत्रांवर दोन्ही बाजूंचा सेतू मजबूत ठेवला. पूना मर्चंट
चेंबरची स्त्री कामगार योजना ही तर बाबांच्या प्रेरणेचे प्रत्यक्ष फलित आहे.
- राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर
-------
‘‘प्रामाणिक, तडफदार आणि तळमळीने कामगारांच्या हक्कांसाठी निष्ठेने लढणारा नेता म्हणजे बाबा आढाव. १९५६ पासून त्यांच्याशी जुळलेली माझी ओळख आजही मनात ताजी आहे. अनेक नेत्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली, परंतु प्रामाणिकपणा जपणारा नेता त्यांच्यासारखा दुसरा होणे नाही. माथाडी कामगार कायदा महाराष्ट्रात रुजविण्याचे निर्विवाद श्रेय त्यांनाच जाते. विविध कामगार कायद्यांविषयी त्यांनी नेहमीच न्याय्य आणि ठाम भूमिका घेतली.
- वालचंद संचेती, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर
----------------------------------------
- डॉ. बाबा आढाव यांनी आयुष्यभर कामगार, वंचित आणि असंघटित घटकांसाठी झटणारी चळवळ उभी केली. ‘एक गाव एक पाणवठा’ सारख्या उपक्रमातून सामाजिक समता रुजवली, तर हमाल-माथाडी कामगारांना कायदेशीर हक्क देण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले. साधी राहणी, प्रखर विचार आणि अहिंसक संघर्ष त्यांच्या कार्याची ओळख राहिली. समाज बदलण्याची ताकद लोकांमध्येच आहे, हा विश्वास त्यांनी आयुष्यभर जपला. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीतील एक तडफदार आणि नैतिक आधारस्तंभ हरपला.
- अरुण वीर, अध्यक्ष, फूल बाजार अडते असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.