पुणे, ता. १२ ः संवाद, पुणे आणि आर्टवाला फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित प्रतिभावान जोडप्यांनी साकारलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ११) झाले. हे प्रदर्शन शनिवारपर्यंत (ता. १३) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालनात सर्वांसाठी खुले आहे.
देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार व प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाप्रसंगी माजी महापौर अंकुश काकडे, ‘संवाद, पुणे’चे सुनील महाजन, आर्टवाला फाउंडेशनचे डॉ. गिरीश चरवड, संदीप भामकर, उत्तम साठे आदी उपस्थित होते.
‘‘कलेचा रसिक या नात्याने मी वैविध्यपूर्ण कलाकृती समजून घेण्याचा प्रयत्न केला’’, असे सांगत मणियार यांनी प्रदर्शनातील कलाकृतींचे कौतुक केले. ‘मित्राची शिल्पकृती साकारावी’, असे मणियार यांना सांगण्यात आले; तेव्हा त्यांनी ‘मित्राची कॉलर ताठ आहेच; ती अधिक ताठ करतो’, असे सांगून पवार आणि आपल्यातील मैत्रीचा धागा किती पक्का आहे, हेच जणू दर्शविले.