- सायली पानसे-शेल्लेकरी
प्रदीर्घ परिपक्व मैत्रीत आनंद असतो तसा नवीन ओळखी करून घेण्यातही वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. अगदी तसेच ज्येष्ठ अनुभवी गायकांचे सादरीकरण अनुभवण्यात आनंद असतो तसाच आनंद आणि उत्सुकता नवीन तरुण गायकांना ऐकण्यातही असतो.
सध्या सुरू असलेल्या ७१ व्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रसिकांना उत्सुकता होती ती युवा गायक सिद्धार्थ बेलमण्णू यांच्या सादरीकरणाची. अतिशय शांत चित्ताने एकेका स्वराचा मागोवा घेत, ‘भीमपलास’ रागातल्या स्वरांवर विहार करत समस्त रसिकांना अस्सल, सात्त्विक राग संगीताची अनुभूती त्यांनी गायनातून दिली. त्यांच्या गायनातील खुला नियंत्रित आवाज, विविध आकर्षक स्वरावली आणि भावपूर्ण सादरीकरणाचा आनंद रसिकांना मिळाला. राग नेहमीचा असला तरी नव्या, वेगळ्या वाटा चोखाळणारे असे त्यांचे गायन झाले. ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग त्यानंतर सादर झाला. आवाज आणि बुद्धीची देणगी असल्यावर त्याची चमक सगळीकडेच दिसते तशी अभंग गायनातही दिसली. या अभंगाचे पारायण केलेल्या रसिकांना एवढी चमत्कृती अपेक्षित नसावी. लोकाग्रहास्तव एक कानडी अभंग गाऊन त्यांनी गायनाचा समारोप केला. पाण्यात रंग मिसळावा आणि पाणी त्याच रंगाचे व्हावे तसेच सुयोग कुंडलकर आणि भरत कामत ज्या कलाकारांना साथ करतात, त्या कलाकाराच्या गायकीशी ते एकरूप होतात असा अनुभव सर्वांनीच घेतला आहे.
सिद्धार्थ यांच्या गायनातून, रसिकांचे राग संगीतातले अनेक गैरसमज दूर झाले असतील. भारतीय राग संगीत हे केवळ आक्रमक तानांचं, तिहायांच आणि टाळ्याच्या कडकडाटाचं नसून, अशा शांत रसाचा परिपोष करणारे आहे. सच्चा कलाकाराला टाळ्यापेक्षा तल्लीनता अपेक्षित असते. राग गायनासाठी आवाज खुला आणि भारदस्त असला तरी त्याच आवाजातले नाजूक, हलके असे आवाजाचे विविध पैलू केवळ भावसंगीतच नाही तर रागसंगीतही अधिक भावपूर्ण करतात.
त्यांनतर भेंडीबाजार घराण्याच्या श्रीमती अनुराधा कुबेर यांचे मंचावर आगमन झाले. निकोप गोड आवाजातले गायन, शुद्ध आकारयुक्त गायकी, वैचित्रपूर्ण बंदिशीतून ‘मुलतानी’ राग सादर केला. स्थायी झपतालात आणि अंतरा एकतालात, तबल्याच्या बोलांचा वापर करून बांधलेली रचना, अशा बंदिशी गायला निश्चितच आव्हानात्मक असतात. पहिल्या रागानंतर त्यांनी ‘प्रताप वराळी’ हा दाक्षिणात्य राग गाऊन, ‘दुर्गा’ रागात ‘त्रिवट’ सादर केले. त्रिवट हा गीतप्रकार म्हणजे सरगम, पखवाजाचे बोल आणि तराण्याचे एकत्रित शब्दांनी युक्त असलेले गीत. प्रतिभावान संगतकार लीलाधर चक्रदेव यांनी हार्मोनिअमवर तर परत एकदा, अनुभवी भरत कामत यांनी तबल्यावर साथ करत सादरीकरणाची रंगत वाढवली.
आजच्या सत्रात गायन, वादन, जुगलबंदी, नृत्य सादर करणाऱ्या एकाहून एक वरचढ कलाकारांची अनेक नावे होती. पं. रूपक कुलकर्णी हे त्याच आवडत्या कलाकारांच्या मंदियाळीतलं एक लाडकं नाव. ‘शुद्ध कल्याण’ रागातल्या शांत गायकी अंगाच्या आलापीने वातावरण भारून टाकले. आलाप-जोड-झाला मधून परिणामकारक राग बढत झाली. जयकिशन हिंगू यांचे रूपकजींबरोबरच्या एकत्रित बासरी वादनात सांगीतिक विचार दिसत होता. तालबद्ध रचनेसाठी त्यांनी ११ मात्रांचा ‘चारताल की सवारी’ हा अप्रचलित ताल निवडला होता. ईशान घोष यांनी तबल्यावर अतिशय तयारीने संगत केली. सादरीकरणाच्या दृष्टीने विषम मात्रांचे ताल गायला-वाजवायला अतिशय आव्हानात्मक असतात; पण सवाईच्या मंचावर ४,६,७,९.५,१०,११ असे अनेक ताल सादर झाल्याने पुण्याचा श्रोता नक्कीच अधिक जाणकार होत आहे. लय वाढल्यानंतर तबला आणि बासरी यांचे सवाल-जवाब टाळ्या मिळवून गेले. त्यांनी ‘सिंदुरा’ रागात रचना सादर करून वादनाचा समारोप केला.
भरत बळवल्ली यांच्या गायनाने रसिकांची वाहवा मिळवली. त्यांना मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनिअम, तर रामकृष्ण करंबेळकर यांनी तबला साथ केली.
सायंकाळच्या सत्रातले पुढचे आकर्षण होते विदुषी डॉ. जयंती कुमरेश आणि विदुषी कला रामनाथ यांची सरस्वती वीणा आणि वायलीनवरील जुगलबंदी. ‘चारुकेशी’ रागाच्या आर्त स्वरात आलापीने वातावरण भारले. वायलीन या वाद्याचा (बोईंग चालू असेपर्यंत) लांब टिकणारा आवाज आणि वीणा या वाद्याचा छेडल्यानंतर लुप्त होणारा आवाज, यामुळे नादाचे वैविध्य निर्माण होते. कुठली वाद्यं एकत्र जुगलबंदीसाठी चांगली वाटतील यामागे अशा विचारांचा समावेश असतो. दोघींच्या एकत्रित सादरीकरणाचा रसिकांनी आनंद घेतला. दोघींनी अध्धा तीनतालात एक गत आणि पखवाज आणि तबल्याच्या साथीत तयारीने पेश केली. त्यांच्या वादनाला जोडून पखवाजावर जयचंद्र राव आणि तबल्यावर पं. योगेश समसी या दोन्ही वादकांचे अतिशय विद्वत्ता आणि सौंदर्यपूर्ण एकल सादरीकरण झाले ज्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. वीणा, वायलीन व तबला, पखवाज अशा चारही वाद्यांच्या एकत्रित सवाल जवाबाने सादरीकरणाचा उच्चांक गाठला.
चौथ्या दिवसाची सांगता करण्यासाठी खास ईशान्य भारतातल्या आसाममधून लखनौ घराण्याच्या मेघरंजनी मेधी यांना पाचारण करण्यात आले होते. कथ्थक शैलीच्या त्या प्रसिद्ध नृत्यांगना आहेत. आजचे सत्र बारापर्यंत असूनही शेवटच्या सादरीकरणापर्यंत रसिकांचा उदंड प्रतिसाद होता.
‘आमच्या नृत्यात लय-तालापेक्षा नृत्यातला डौल अधिक बोलका असतो’, असे सांगत त्यांनी देवी स्तुतीने प्रारंभ केला. तीनतालात विलंबित, मध्य आणि द्रुत लयीत विविध तुकडे, उठाण, परण आणि तयारीचा पदन्यास करत त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. गत निकास व गत भाव याचे सादरीकरण रंगले. ४५ चक्करची परन पूर्ण करत अतिशय डौलदारपणे समेवर येत त्यांनी तयारीचे प्रदर्शन केले. कथ्थक नृत्यातला अभिनय पक्ष दाखवण्यासाठी त्यांनी कृष्ण लीला निवडल्या होत्या. आकर्षक देहबोली, रसाचा परिपोष, भावनोत्कट अभिनय, पदलालित्य असे अनेक पैलू उलगडत त्यांच्या नृत्याने रसिकांची मने जिंकली.
सर्वांत उत्साही अन् ज्येष्ठ
सवाईच्या मंचावरचे ५० वर्षांपासूनचे सर्वांत उत्साही आणि ज्येष्ठ कलाकार म्हणजे आदरणीय माउली टाळककर. भीमसेनजींपासून आजच्या सर्वांत लहान कलाकारापर्यंत सर्वांना साथ करत ते आशीर्वाद देत असतात. आपल्या कामात ते इतके एकाग्र आणि समरस असतात की वादन झाल्यावर सत्काराचीदेखील त्यांना आस नसते. त्यासाठी ते कधीच मंचावर थांबतदेखील नाहीत. त्यांच्या उदंड आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.