पुणे, ता. १९ ः ‘‘महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसमवेत चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये अजून चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाण्याबाबत पक्षामध्ये दोन मतप्रवाह असले तरीही, त्यांच्याकडूनही आम्हाला अजून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी शुक्रवारी पक्षाच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात हजेरी लावली. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापू पठारे, माजी आमदार अशोक पवार, रवींद्र माळवदकर आदी उपस्थित होते.
साताऱ्यातील अमली पदार्थाच्या साठ्याबाबत शिंदे म्हणाले, ‘‘अमली पदार्थ प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चीट दिली. शेवटी फडणवीस यांना सरकार चालवायचे आहे. त्यांना मित्रपक्षाला नाराज करायचे नाही, तसेच दिल्लीवरूनही त्यांना सांगितले असेल. साताऱ्यात अमली पदार्थ सापडणे हा गंभीर प्रश्न असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. गृह खाते अपयशी ठरले आहे.’’
भाजप अजित पवार यांनाच दूर का ठेवते?
‘‘शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांचे महापालिका निवडणुकीनंतर अस्तित्व संपणार असे विरोधक बोलत आहेत. प्रत्यक्षात असा कुठलाही पक्ष संपत नसतो, मात्र भाजप मित्रपक्षाचा वापर फक्त निवडणुकीपुरता करते. महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र येत आहेत, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दूर ठेवण्याचे काम होते. त्यांच्याच मंत्र्यांवर राजीनाम्याची वेळ येते, असे का होते? भाजपकडून निष्ठावंतांना निवडणुकीमध्ये संधी देण्याऐवजी आयात उमेदवारांना संधी दिली जात आहे. त्यामुळे भाजप इतर पक्षांना नव्हे, तर आपल्याच निष्ठावंतांना संपवत चालले आहे,’’ असा आरोप ही शिंदे यांनी केला.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.