पुणे, ता. १९ : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय, निवडणूक व सुरक्षा व्यवस्था सज्ज असून, पात्र मतदारांनी निर्भय आणि उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता. २०) मतदान होणार आहे. या निवडणुकीत बारामती आणि फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेसाठी पूर्ण निवडणूक, तर लोणावळा, तळेगाव दाभाडे आणि दौंड नगरपरिषदेतील काही प्रभागांचा समावेश आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असून, आयोगाच्या निर्देशानुसार मतदानापूर्वी मॉक पोल घेतला जाणार आहे.
अध्यक्षपदासाठी बारामती नगरपरिषदेत १४, तर फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेत सात उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवकपदासाठी बारामतीतील ४१ जागांसाठी १५५ उमेदवार, फुरसुंगी-उरुळी देवाची येथे ३२ जागांसाठी १२० उमेदवार, दौंड येथील एका जागेसाठी (प्रभाग क्रमांक ९ अ) तीन उमेदवार, लोणावळा येथील दोन जागांसाठी (प्रभाग क्रमांक ५ ब आणि १० अ) पाच उमेदवार, तर तळेगाव दाभाडे येथील पाच जागांसाठी (२ अ, ८ अ, ८ ब, ७ ब व १० ब) १२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
मतदानासाठी २३१ मतदान केंद्रे
जिल्ह्यातील दोन नगरपरिषदांसाठी पूर्ण निवडणूक आणि तीन नगरपरिषदांतील काही प्रभागांच्या निवडणुकीत मतदानासाठी २३१ मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. या निवडणुकीत एकूण दोन लाख १२ हजार ३९६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरुष १ लाख ८ हजार ३१०, महिला १ लाख ४ हजार ५६ आणि इतर ३० मतदारांचा समावेश आहे.
कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने २० डिसेंबर रोजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. केंद्र शासनाची कार्यालये, निम्न शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व बँकांनाही ती लागू राहील.
मतमोजणी उद्या
सर्व मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, एक हजार ४२५ अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी तैनात असतील. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.