पुणे, ता. ३ : शहरात गेल्या दोन दिवसांपासून हलक्या पावसाने हजेरी लावली होती. मात्र गुरुवारी (ता. ३) पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून, कमाल तापमानातदेखील मोठी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुणे आणि परिसरात गुरुवारी पहाटे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला. मात्र काही वेळ सुरू असलेल्या पावसाने नंतर दिवसभर विश्रांती घेतली होती. दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे कमाल तापमानातदेखील घट नोंदविण्यात आली. शहरात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस इतके, तर २१.९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढणार असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारी घाट विभागातील काही परिसरात २५० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
असा आहे पावसाचा अंदाज
पुणे आणि परिसरात शुक्रवारी (ता. ४) कमाल तापमानात किंचित घट होणार असून, कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारपासून (ता. ५) पुढील तीन दिवस कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून, कमाल तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.