पुणे, ता. ८ : महापालिकेच् याभारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाने आतापर्यंत वारंवार डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात दिली तरी त्यांना अतिविशेषोपचारतज्ज्ञ असलेले डॉक्टर मात्र मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे या डॉक्टरांचा ११ महिन्यांचा कंत्राटाचा कालावधी वाढविण्याचा विचार आता महापालिकेचा आरोग्य विभाग करत आहे.
या महाविद्यालयाला एक महिन्यापूर्वी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने विविध अटींची पूर्तता न केल्याप्रकरणी मान्यता रद्द करण्याची नोटीस पाठवली होती. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुधारणांकडे महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने घेतले आहे. सध्या महापालिकेच्या मंगळवार पेठेतील बाबूराव सणस शाळेत सूरू असलेले हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित इमारतीचे बांधकाम नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेत सुरू आहे. तेथे हे महाविद्यालय स्थलांतरित होत असलेल्या इमारतींचे काम केले जाणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत इमारतीचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाला नेण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
पायाभूत सुविधांचा अभाव, प्राध्यापकांची कमतरता, अपूर्ण आकृतिबंध अशा अनेक त्रुटींबाबत आयोगाने महाविद्यालयाला जाब विचारला होता. अनेकदा सूचना देऊनही त्रुटी दूर करण्याबाबत कार्यवाही होत नसल्याने कॉलेज बंद का करू नये आणि एक कोटी रुपयांचा दंड का ठोठावू नये, अशी विचारणा केली. याबाबत महाविद्यालयासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टने कार्यवाहीसाठी मुदत मागितली होती. त्यानंतर आता युद्धपातळीवर महाविद्यालयाच्या त्रृटींवर काम सुरू आहे.
आयुक्तांच्या उपस्थितीत ट्रस्टची बैठक
महाविद्यालयाच्या कामकाजाबाबत आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी ट्रस्टची बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वी अतिरिक्त आयुक्त पी. चंद्रन यांनी गेल्या आठवड्यात या महाविद्यालयाला भेट दिली आणि सर्व कामकाजाची माहिती देऊन आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर नायडू रुग्णालय परिसराच्या इमारतीचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला व वसतिगृह आणि महाविद्यालयाच्या स्वतंत्र रुग्णालयाचे कामही पूर्ण केले जाणार आहे.
महाविद्यालयासाठी आम्ही वारंवार जाहिराती दिल्या मात्र, डॉक्टर येत नाहीत. त्यासाठी आताचा अकरा महिन्यांचा कंत्राट कालावधी वाढवण्याचा विचार सुरू आहे. आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक सुधारणा करून स्वतंत्र इमारतीचे बांधकाम, मनुष्यबळ भरती प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा, स्टाफ रूम आणि मूलभूत वैद्यकीय सुविधा यांचा समावेश केला जात असून ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
- पी. चंद्रन, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.