पुणे, ता. ८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील उन्हाळी सत्र परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षांमधील एम.ई. (२०१७ पॅटर्न) या अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच विद्यापीठाच्या https://onlineresults.unipune.ac.in/Result/Dashboard/Default या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे. या परीक्षेतील उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांना ११ ते २० जुलै दरम्यान अर्ज करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
विद्यार्थ्यांना दिलेल्या कालावधीत उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी सशुल्क अर्ज करावा लागणार असून, छायांकित प्रत २१ जुलैनंतर उपलब्ध होतील. छायांकित प्रत उपलब्ध होताच विद्यार्थ्यांना गुणपडताळणीत काही शंका किंवा एखादा प्रश्न तपासला नसेल, असे आढळल्यास त्यांनी गुणपडताळणीसाठी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत उपलब्ध होताच पाच दिवसांत विनाशुल्क अर्ज करावा; परंतु विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास त्यांनी छायांकित प्रत मिळाल्यावर पुनर्मूल्यांकनासाठी सशुल्क अर्ज करावेत. गुणबदलाची पुन्हा खात्री करायची असल्यास विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत पुन्हा ऑनलाइन सशुल्क अर्ज करावा लागेल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले आहे.