पुणे, ता. १० ः लहान मुलांमध्ये टिव्ही, मोबाईलचे असणारे आकर्षण कमी व्हावे, बालपणीच त्यांच्यात खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेकडून अंगणवाडीच्या धर्तीवर ‘क्रीडा नर्सरी’ सुरू करण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यांत मगरपट्टा परिसरात प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेकडून पुण्यातील पहिल्या ‘क्रीडा नर्सरी’ची निर्मिती केली जाणार आहे. त्यास मिळणाऱ्या प्रतिसादानंतर भविष्यात शहराच्या वेगवेगळ्या भागात हा उपक्रम राबविला जाणार आहे.
शहरामध्ये अगोदरच असणारा मैदानांचा अभाव आणि कोरोना कालावधीत लागलेल्या मोबाईल, टीव्हीच्या व्यसनांमुळे लहान मुलांचे खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मुलांमध्ये पुन्हा एकदा खेळांची आवड निर्माण व्हावी, त्यांना विविध प्रकारे खेळ लीलया खेळता यावेत, खेळांच्या माध्यमातून मुलांच्या शारीरिक व मानसिकता सुदृढ व्हावी, यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून ‘क्रीडा नर्सरी’ ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.
महापालिकेने २०१३ मध्ये तयार केलेल्या क्रीडा धोरणानुसार संबंधित ‘क्रीडा नर्सरी’ची संकल्पना मांडण्यात आली असून, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून महापालिकेच्या भवन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. वास्तुविशारदांकडून त्यासंबंधीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. आगामी एक महिन्यात संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
हडपसरजवळील मगरपट्टा येथे असणाऱ्या सीझन मॉलजवळ महापालिकेची क्रीडांगणासाठीची तीन एकरांची आरक्षित जागा आहे. या जागेवर डिसेंबरअखेरपर्यंत ‘क्रीडा नर्सरी’ सुरू केली जाणार आहे. महापालिकेच्या अंगणवाड्यांच्या धर्तीवरच ‘क्रीडा नर्सरी’ असणार आहे. या नर्सरीमध्ये ३ ते ७ व ८ ते १२ या वयोगटातील मुलांना सकाळी व सायंकाळी खेळण्याची संधी दिली जाणार आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांना खेळाची माहिती दिली जाणार आहे. मुलांची शारीरिक क्षमता, लवचिकता व शक्ती यानुसार त्यांच्यात आवश्यक खेळ रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
-------
मुलांना बालपणातच खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ‘क्रीडा नर्सरी’द्वारे काम केले जाणार आहे. मुलांच्या शारीरिक वैशिष्ट्यांनुसार त्यांची आवड असणाऱ्या खेळांची निवड करून मुलांना मार्गदर्शनाची सुविधा दिली जाणार आहे. मगरपट्टा परिसरात प्रायोगिक तत्त्वावर ही नर्सरी केली जाणार आहे. त्यास मिळणाऱ्या प्रतिसादानंतर भविष्यात शहरात इतर ठिकाणी ही नर्सरी सुरू करण्याचा विचार सुरू आहे.
-किशोरी शिंदे, उपायुक्त, पुणे महापालिका
------------
* क्रीडा नर्सरीची वैशिष्ट्ये
- मुलांमध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून खेळांची आवड निर्माण केली जाणार
- मुलांच्या वयोगटानुसार दोन गटांमध्ये विभागणी करून मार्गदर्शन केले जाणार
- शासनमान्य संस्थांद्वारे क्रीडा नर्सरीद्वारे मिळणार प्रशिक्षण
- भविष्यात शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुरू होणार क्रीडा नर्सरी
--------------
* खेळांचे प्रकार
- जिम्नॅस्टिक
- मल्लखांब
- बॉलगेम
- क्लाइंबिंग वॉल
- मनोरंजनात्मक उपक्रम
- सेन्सरी खेळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.