पुणे, ता. २५ : कुशल व पारंगत शल्यविशारद (लॅप्रोस्कोपिक सर्जन) होण्यासाठी ‘बीजे’ तथा ससून रुग्णालयातील सामान्य शस्त्रक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, कान – नाक – घसा आणि स्त्रीरोग विभागांमधील निवासी डॉक्टर चक्क प्रवासी बसमध्ये विकसित केलेल्या शस्त्रक्रियागृहात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याची रंगीत तालीम करत आहेत. अद्ययावत, वातानुकूलित व प्रत्यक्ष शस्त्रक्रियागृहात असल्याचा ‘फील’ देणाऱ्या या बसमध्ये कृत्रिम मानवी बाहुल्यांमध्ये ठेवलेल्या प्राण्यांच्या अवयवांवर हे डॉक्टर शस्त्रक्रियेचे धडे गिरवून पारंगत होत आहेत.
पारंपारिक पद्धतीमध्ये अवयव उघडून शस्त्रक्रिया केली जाते. ती करताना सर्जन पोटावर/ अवयवांवर चिरा देऊन शस्त्रक्रिया करून तेथे हातानेच टाकेही घालतो. ही प्रक्रिया सोपी असते. मात्र, होणारी मोठी जखम, रक्तस्राव व रुग्णाला बरे होण्यासाठी लागणारा दीर्घ कालावधी याला पर्याय म्हणून अलीकडील काळात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियांना पसंती मिळत आहे. रुग्णांसाठी बहुपयोगी ठरणारी ही शस्त्रक्रिया मात्र डॉक्टरांसाठी तितकीच कठीण व आव्हानात्मक असते. कारण यामध्ये रुग्णाच्या अवयवांत उदा. पोटात छोटा छेद देऊन त्यामधून दुर्बीण व कॅमेरा असलेला लॅप्रोस्कोप, विद्युत शस्त्रक्रिया उपकरण, टाके घालण्याची सुई व दोरा, कात्री, चिमटे (फोर्सेप्स) आदी साधने टाकून ही शस्त्रक्रिया करावी लागते. विशेष म्हणजे हे सर्व समोर पडद्यावर पाहून करावे लागत असल्याने त्याला कमालीचे कौशल्य लागते.
शासकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या या भावी डॉक्टरांना जर ‘लॅप्रोस्कोपिक सर्जन’ व्हायचे असेल तर त्यासाठीचे प्रशिक्षण व मुख्य म्हणजे तसा सराव करण्यासाठी पुरेशी वैद्यकीय साधने उपलब्ध असतातच असे नाही. मात्र, ससून रुग्णालयात शल्यविशारद होऊ पाहणाऱ्या निवासी डॉक्टरांना आता याची काळजी नाही. कौशल्यवृद्धी उपक्रमाअंतर्गत ‘जॉन्सन ॲण्ड जॉन्सन’ या कंपनीने ही ‘ऑपरेशन ऑन व्हील’ ही बस विकसित केली असून, त्यामध्ये ५ शस्त्रक्रिया टेबल आहेत. प्रत्येक टेबलवर मानवी बाहुलीच्या पोटात डॉक्टरांच्या गरजेनुसार माणसांच्या अवयवांशी साधर्म्य असणारे प्राण्यांचे वेगवेगळे अवयव ठेवले असून, त्यावर खराखुरा सराव करता येत असल्याचे प्रशिक्षण घेत असलेल्या स्त्रीरोग विभागाच्या डॉ. मनीषा गायकवाड, डॉ. कंकणा सागरतालुकदार, डॉ. स्नेहा बोरा यांनी सांगितले.
.........
‘‘डॉक्टरांच्या कौशल्यवृद्धीसाठी राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयांत जाऊन आम्ही गेल्या महिन्यापासून मोफत सेवा देतो. गेल्या दोन दिवसांपासून ही बस ‘बीजे’ च्या आवारात असून, त्यावर दररोज १५ ते २० सर्जन सराव करतात. याआधी कंपनीचे माहिममध्ये असे कौशल्यवृद्धी केंद्र होते. तेथे यावे लागत असल्याने डॉक्टरांचा प्रवासात वेळ जायचा. मात्र, आता दहा कोटी रुपये खर्च करून ही अद्ययावत बस तयार केली असून, त्यामध्ये प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करत असल्याचा अनुभव येतो.
– शैलेश चौगुले, वैद्यकीय प्रतिनिधी, जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनी
..........
‘‘लॅप्रोस्कोपिक सर्जन होऊ पाहणाऱ्या डॉक्टरांची यामध्ये रंगीत तालीम होते. सरावादरम्यान कोणत्या चुका होतात, हे यावेळी समजते व त्याचा उपयोग प्रत्यक्ष रुग्णांवर अचूक शस्त्रक्रिया करण्यासाठी होतो.
– डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
...........
कोणत्या शस्त्रक्रियेत होतो फायदा?
– हर्निया, ॲपेंडिक्स, पित्ताशय काढणे व इतर आतड्यांच्या शस्त्रक्रिया
– गर्भाशय काढून टाकणे व कर्करोग शस्त्रक्रिया
– पोटातील अवयवांमध्ये दुर्बिणीद्वारे टाके घालणे, स्टेपल करणे आदी
फोटो ः 34496
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.