सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ४ : शहरात सदनिका विकत घेताना रेडी रेकनरप्रमाणे परिसरातील दर निश्चित असतो. तो ग्राह्य धरून त्यावर सात टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागते. त्याच ठिकाणी मोकळ्या जमिनीचा रेडी रेकनरमधील दर आणि बांधकाम खर्चाचा निश्चित झालेला दर विचारात घेतल्यास सदनिकेच्या दरात प्रती चौरस फूट किमान तीन ते चार हजार रुपयांचा फरक दिसतो. परिणामी ग्राहकांना प्रती चौरसफूट अकारण जास्त मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्याचे उघड झाले आहे.
राज्य सरकारने रेडी रेकनरनुसार दर नव्याने लागू करण्यास नुकतीच मान्यता दिली. एक एप्रिलपासून राज्यभरात तशी अंमलबजावणी सुरू झाली. नव्या आर्थिक वर्षात पुणे शहरात रेडी रेकनरचे दर सरासरी ४.१६ टक्के वाढल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात तज्ज्ञांच्या मदतीने रेडी रेकनरमधील दरांचा अभ्यास केल्यानंतर अशी चलाखी अनेक बाबतींत उघड झाली आहे. विशेषतः मोकळ्या जमिनी, बांधकामाचा निश्चित झालेला दर आणि सदनिका, कार्यालये व दुकाने यांच्या प्रती चौरस फूट दराची तुलना केल्यानंतर सर्वाधिक तफावत दिसते. त्यामुळे ग्राहकांना जादा दरावर अकारण मुद्रांक शुल्क भरावे लागत आहे.
रेडी रेकनरचे दर जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक दर असलेल्या दहा विभागांची यादी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने जाहीर केली. त्यातील एका रस्त्याचे उदाहरण घेऊन हे गणित केल्यानंतर चित्र स्पष्ट होते.
अशी झाली आहे चलाखी
शहरात सर्वाधिक दर असलेल्या भागात प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता आणि परिसराचा समावेश होतो. या परिसरातील मोकळ्या जमिनीचा रेडी रेकनरमध्ये दर प्रती चौरस मीटर ८६ हजार ७१८ रुपये म्हणजे प्रती चौरस फूट ८ हजार ५५ रुपये असा धरला आहे. बांधकामाचा खर्च प्रती चौरस मीटर २७ हजार ९५१ म्हणजे २ हजार ५९६ रुपये निश्चित झाला आहे. या दोन्ही आकड्यांची बेरीज दहा हजार ६५१ रुपये एवढा येतो.
महापालिकेचे बांधकाम विकसन शुल्क, प्रिमियम, टीडीआर आदींचे प्रती चौरस फुटाचे जास्तीचे एक हजार रुपये शुल्क ग्राह्य धरल्यास सदनिकेचा दर ११ हजार ६५१ रुपये इतका येतो. रेडी रेकनरमध्ये मात्र त्या रस्त्यावरील सदनिकेचा दर प्रती चौरस मीटरचा १ लाख ६५ हजार २२० म्हणजे १५ हजार ३५० रुपये प्रती चौरस फूट इतका धरला आहे. वास्तविक तीच मोकळी जागा, बांधकाम खर्चाचा दरही निश्चित, तसेच सर्व प्रकाराच्या परवानग्यांसाठी होणारा खर्च आणि बांधकाम व्यावसायिकांचा नफा अपेक्षित धरूनही रेडी रेकनरमध्ये सदनिकेचा प्रती चौरस फूट २ हजार ७०३ रुपये दर जादा धरण्यात आला आहे.
दुसरीकडे मोकळी जागा तीच, बांधकाम खर्च तेवढाच परंतु तेथे दुकान असेल तर प्रती चौरस मीटर २ लाख १९ हजार ८२० रुपये म्हणजे प्रती चौरस फूट २० हजार ४२१ रुपये इतका करण्यात आला आहे. यावरून प्रती सदनिका आणि दुकानांच्या पोटी २ हजार ७०० ते १८ हजार ७७४ रुपयांनी अधिकचे दर रेडी रेकनरमध्ये करण्यात आले आहेत. दस्तनोंदणी करताना या अधिकच्या दरावर प्रती चौरस फूट सात टक्क्यांनी जादा मुद्रांक शुल्क भरावे लागत आहे.
---
नेमके कारण काय?
रेडी रेकनरमधील मोकळ्या जमिनीच्या नव्या आर्थिक वर्षातील आणि गेल्या वर्षातील दराची तुलना केल्यास बहुतांश ठिकाणी मोकळ्या जमिनींचे दर तेच ठेवण्यात आले आहेत. सदनिका, दुकाने आणि कार्यालयासाठी दरात वाढ करण्यात आली आहे. वास्तविक रेडी रेकनरमधील मोकळ्या जमिनीच्या ठरलेल्या दराने कुठेही जमीन मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. असे असताना हे दर न वाढविण्यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न जाणकार विचारत आहेत. पुणे शहरातील काही ठिकाणी आरक्षित जमिनींच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. सखोल चौकशी केल्यानंतर मोकळ्या जमिनीचा दर कमी ठेवण्यामागे काळा पैसे जिरवणे सोईचे जावे, हा एक हेतू असू शकतो असे सांगण्यात आले.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.