राधिका वळसे पाटील : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ९ : वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे पाळीव प्राण्यांनाही विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आवाहन पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. या प्राण्यांनाही उन्हाळ्यात भरपूर पाणी द्या, उन्हापासून त्यांना दूर ठेवा, त्यांच्या अंगावर सतत पाणी शिंपडा आदी उपाय त्यांनी सुचविले आहेत.
अचानक वाढलेल्या उन्हामुळे पाळीव प्राणी आजारी पडतात. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी खालावते, त्यामुळे भूक मंदावणे, मलूल पडणे तसेच दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार प्राण्यांत वाढत आहेत. शहरी भागांत वेगवेगळ्या प्रकारचे श्वान, मांजर पाळली जाते तर ग्रामीणभागात गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या तसेच अनेक पक्षी नागरिक पाळतात. मात्र, वातावरणात बदल झाला की, पक्षी-प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात. श्वानांचे आणि मांजरीच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे त्यांचे या काळात केस गळतात. अतिसार, थकवा येणे, एकाजागी शांत पडून राहणे किंवा विष्ठा पातळ होणे, जास्त श्वास घेणे, लाळ येणे, सुस्ती येणे, उलट्या होणे आणि कोलमडणे अशी लक्षणे या प्राण्यांत दिसतात.
उष्माघातापासून वाचण्यासाठी....
- दुपारच्या वेळी प्राण्यांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे
- प्राण्यांना थंड ठिकाणी ठेवा, भरपूर पाणी पाजा
- शरीराचे तापमान कमी करण्यासाठी पंखे किंवा एअर कंडिशनिंग वापरा
- त्वचेचा आजार उद्भवणार नाही यांची काळजी घेत त्यांना अंघोळ घाला
- अंघोळीनंतर त्यांचे शरीर पूर्णपणे कोरडे करा
- उन्हाच्यावेळी प्राण्यांना बाहेर नेणे टाळा
- दुपारी त्यांना डांबर आणि काँक्रिटवर फिरवू नका
- घराभोवती पाण्याने भरलेले भांडे ठेवा
- योग्य, मुबलक आणि पोषक आहार द्या
‘ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ (एडब्ल्यूबीआय) तर्फे उन्हाळा सुरु होताच पाळीव प्राणी तसेच रस्त्यांवरील पशू-पक्ष्यांसाठी विविध योजना, त्यांना लागणाऱ्या सुविधा, मार्गदर्शन, नियमावली जाहीर केली जाते. त्यात नगरपालिका तसेच विविध सामाजिक संस्थांचा समावेश असतो. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याने भरलेले भांडे ठेवणे, ते कायम भरलेले असतील याची दक्षता घेणे, त्यांच्यासाठी शेड उभारणे आदींचा समावेश आहे.
डॉ. सारिका फुंडे-भोसले,
मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका
उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांच्या खाण्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. अंडी, चिकन, मटण आदी उष्ण खाद्यपदार्थ त्यांना देणे टाळावे. यावर उपाय म्हणून पाण्यात दही अथवा ताक मिसळून देणे, कलिंगडाच्या फोडी, काकडी असे पाणीदार पदार्थ त्यांना द्यावे. तसेच स्वच्छ पाणी प्यायला देताना त्यात इलेक्ट्रो पावडर टाकली तरी चालेल.
- शिवराज शेलार, पशुवैद्यकीय अधिकारी
माझ्याकडे ‘हस्की’ या प्रजातीचा श्वान आहे. उन्हाळ्यात त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. आम्ही त्याला पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळातच फिरायला बाहेर घेऊन जातो. तसेच त्याच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. थंड वातावरणाच्या ठिकाणी ठेवल्यास श्वान, मांजरी सुखावतात.
- वैष्णवी मारणे, प्राणीप्रेमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.