पुणे, ता. १ : सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोर चहाच्या हॉटेलसमोरील १२ जणांना धडक देणाऱ्या मद्यधुंद वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाहनचालकाने मद्यपान केले होते. त्याला मोटार चालविता येत नसल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.
जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी, मूळ रा. मुळज, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे कारागृहात रवानगी केलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. अपघातावेळी मोटारीमध्ये असलेला सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) आणि मोटार मालक दिगंबर शिंदे (वय २७) यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस पाठवून देत सोडून दिले आहे. पोलिसांनी शनिवारी मुळेसह गोसावी आणि शिंदेला ताब्यात घेतले होते. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. याबाबत मुळेवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोरून छत्रपती राजाराम मंडळाकडे जाणाऱ्या गल्लीत चहाचे हॉटेल आहे. शनिवारी सायंकाळी भरधाव मोटारीने चहा प्यायला थांबलेल्या १२ जणांना धडक दिली. या अपघातात तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहोत. तर इतरांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.
मुळे याने मद्यपान करून मोटार चालवत १२ जणांना उडविले आहे. या अपघातात १२ जण जखमी झाले असून, काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. त्यातील काहींची रविवारी परिक्षा होती. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मुळे याला न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. या गुन्ह्याचा तपास विश्रामबाग ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश फडतरे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.