pune Ganeshotsav crowd mismanagement

 

esakal

पुणे

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात मध्यवर्ती पेठांमध्ये चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती; समन्वयाचा अभाव

Pune Ganeshotsav Crowd: मध्यवर्ती पेठांमध्ये चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती, अरुंद रस्त्यांवर भाविकांची कोंडी, पोलिस व गणेश मंडळांमधील समन्वयावर प्रश्नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सवाचे विलोभनीय देखावे पाहण्यासाठी मध्यवर्ती भागात दररोज लाखो भाविकांचा महापूर येत असताना, पोलिस आणि गणेश मंडळांमधील समन्वयाच्या अभावामुळे गर्दी व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. शनिवार आणि रविवारी लक्ष्मी रस्ता, मंडई आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरात अक्षरशः चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाच्या नियोजनाबाबत भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

शहरात १४ सप्टेंबरपासून आतापर्यंत सुमारे २० लाखांहून अधिक भाविकांनी पेठांसह प्रमुख मंडळांच्या दर्शनाचा लाभ घेतला. पोलिस प्रशासनाकडून शनिवारवाडा ते मंडई दरम्यान गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी एकेरी मार्ग करून योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर अन्य पेठांच्या परिसरात गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे. मात्र, पेठांच्या इतर भागात येणाऱ्या आणि जाणाऱ्या भाविकांच्या प्रवाहात समन्वय नसल्याने अरुंद रस्त्यांवर भाविकांची कोंडी झाली.

बॅरिकेड्सजवळ ताण येऊन ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची मोठी गैरसोय झाली. दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी विसर्जनापर्यंत पुढील चार दिवस भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून आणखी सूक्ष्म आणि योग्य पद्धतीने नियोजन व्हावे, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मेट्रोतही प्रवाशांचा उच्चांक

रस्त्यांवरील कोंडीमुळे नागरिकांनी मेट्रोला पसंती दिली असली, तरी मेट्रो स्थानकांवरही गर्दी उसळली. शनिवारी रात्री आठपर्यंत तीन लाख सहा हजार २६८ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. मंडई स्थानकात सर्वाधिक ३८ हजार ६७७, पीसीएमसी स्थानकात ३६ हजार ९११, तर रामवाडी स्थानकात ३० हजार ३५० प्रवाशांची नोंद झाली. जिल्हा न्यायालय स्थानकावर ६६ हजारांहून अधिक प्रवाशांनी मार्गिका बदलली. स्थानकातून बाहेर पडताच पेठांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याने नागरिकांचे हाल झाले.

पोलिसांनी हे करावे

  • दोन किंवा तीन रस्ते एकत्र येणाऱ्या जंक्शनवर भाविकांची धक्काबुक्की होऊ नये म्हणून येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र ‘वन-वे’ पादचारी मार्ग करावेत.

  • छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील नियोजनाच्या धर्तीवरच लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता आणि अंतर्गत पेठांमधील अरुंद गल्ल्यांमध्ये गर्दीचे व्यवस्थापन राबवावे.

  • मध्यवर्ती पेठांमध्ये पोलिस कर्मचारी, होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दल आणि वाहतूक वॉर्डनची संख्या वाढवावी. पर्यायी मार्गांचे फलक आधीच लावावेत, जेणेकरून भाविकांची एकाच ठिकाणी कोंडी होणार नाही.

हायटेक बंदोबस्त; पण नियोजनाचा अभाव

पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी वॉचटॉवर, सीसीटीव्ही आणि ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे. छेडछाड आणि मोबाईल चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखा आणि निर्भया पथक तैनात आहे. मात्र, रस्त्यांवरील प्रत्यक्ष गर्दीचे नियोजन, स्वतंत्र प्रवेश-निर्गमन मार्ग आणि पादचाऱ्यांचा प्रवाह सुरळीत ठेवण्याची गरज आहे.

गणेश मंडळांनी हे करावे

  • गर्दी नियंत्रणासाठी मंडळांनी प्रशिक्षित स्वयंसेवकांची संख्या वाढवावी

  • महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या दर्शनासाठी स्वतंत्र रांगा तयार कराव्यात. गर्दीत भाविकांना त्रास होऊ नये यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी

  • गर्दीचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी भाविकांना पुढे जाण्याचे आवाहन सातत्याने ध्वनिक्षेपकावरून करावे देखावे पाहताना एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.

दरवर्षी आम्ही देखावे पाहतो; पण यंदा पोलिसांनी अचानक रस्ते बंद केल्यामुळे आम्ही पाऊण तास एकाच ठिकाणी अडकून पडलो. लहान मुलांसह आम्हाला गुदमरल्यासारखे वाटत होते. सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. - स्वाती देशमुख, नागरिक

मंडई आणि दगडूशेठ परिसरातील गर्दीचा अंदाज प्रशासनाला आधीच यायला हवा होता. उत्सव पाहण्याचा आनंद बाजूला राहिला आणि सुखरूप घरी कसे पोहोचणार, याचीच भीती वाटत होती. - अमित जोशी, नागरिक

भाविकांनो, ही घ्या खबरदारी !

  • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अतिगर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे

  • मुलांच्या खिशात किंवा गळ्यात नाव व पालकांचा संपर्क क्रमांक असलेली चिठ्ठी ठेवावी

  • ढकलाढकली सुरू झाल्यास प्रवाहाविरुद्ध न जाता मोकळ्या जागेचा मार्ग शोधावा

  • संशयास्पद हालचाली, छेडछाड किंवा चोरीचा प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा

गणेशोत्सवात गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची गर्दी लक्षणीय वाढली आहे; मात्र कोठेही चेंगराचेंगरीसारखा प्रकार घडलेला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. धक्काबुक्की टाळण्यासाठी जिजामाता चौक, बुधवार चौक आणि बेलबाग चौकातून भाविकांना टप्प्याटप्प्याने पुढे सोडण्यात येत आहे. प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी जिवंत देखावे पाहण्यासाठी भाविक एकाच जागी थांबून गर्दी वाढते, तेथे गर्दी नियंत्रित होईपर्यंत देखावा तात्पुरता बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. - कृषिकेश रावले, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. असाच अनुभव तुम्हालाही आला आहे का? यावर काय उपाययोजना कराव्यात. याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांचा सहभाग

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT